- सारिका पूरकर-गुजराथीकाही दिवसांपूर्वी आपण म्हणत होतो की माणूस आता मोबाईलशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. पण आता माणूस सेल्फीशिवाय जगू शकत नाही, असं म्हणण्याची वेळ आली आहे. स्मार्ट फोनमधील फ्रंट कॅमेऱ्यामुळे सेल्फीनं फोटोग्राफीच्या विश्वात क्रांतीच घडवून आणली आहे...सोशल मीडिया, इन्स्ट्राग्राम, व्हॉॅट्सअॅप प्रोफाईल्स यावर या सेल्फीजनी केव्हाच कब्जा केला आहे. ‘सेल्फी विथ’ मग ती कशाबरोबरही काढली जातेय...सर्वात उंच, धोकादायक टॉवर वर केलेली चढाई असो अथवा चित्रविचित्र वेशभूषा किंवा मग गरोदरपणातील नऊ महिन्यांचा अनुभव.सगळ्यासाठी आणि सगळ्यांसमवेत सेल्फी काढली जातेय.सेल्फीजच्या दुनियेत हजारो आविष्कार सध्या बघायला मिळत आहेत. तर अशा या सेल्फीजच्या माध्यमातून लोकं स्वत:ची ओळख कशी करुन देत आहेत, ते काय सांगताय या सेल्फीजमधून हे जाणून घेण्याचा प्रयत्न गॉर्जिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी केला. त्याकरिता त्यांनी इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केलेल्या २.५ दशलक्ष सेल्फीजचा अभ्यास केला.
सेल्फीचा अभ्यास काय सांगतो?*हा अभ्यास करताना १४ प्रकारात सेल्फीजची विभागणी केली होती. यात सर्वात अधिक सेल्फीज कोणत्या प्रकारात आढळतात, सर्वात कमी कोणत्या प्रकारात? असं निरीक्षणही त्यांना नोंदवायचं होतं. आश्चर्याची बाब या अभ्यासात आढळली ती म्हणजे या संशोधकांना १४ प्रकारच्या सेल्फीजची अपेक्षा होती. त्या निकषांवर ५२ टक्के सेल्फीज अयशस्वी ठरल्या. कारण या सेल्फीजमध्ये मेकअप, कपडे, ओठ दाखविणाऱ्या सेल्फीज अधिक होत्या. आपला लूक प्रदर्शित करणाऱ्या सेल्फीजचं प्रमाण या १४ निकषांच्या सेल्फीजपेक्षा दुप्पट होतं. * स्वत:च्या लूक प्रदर्शित करणाऱ्या सेल्फीजनंतर १४ टक्के सेल्फीज या मित्र, नातेवाईक, प्राणी-पक्षी यांच्याबरोबर काढलेल्या होत्या. १३ टक्के सेल्फीज या समधर्मीय, समजातीय लोकांच्या समूहाच्या आणि राष्ट्रीयत्व सांगणाऱ्या होत्या. प्रवासादरम्यान काढलेल्या सेल्फीजचं प्रमाण ७ टक्के होतं . आरोग्य आणि फिटनेससंदर्भातील सेल्फीज ५ टक्के. होत्या * ग्रूपपेक्षा वैयक्तिक सेल्फीजचं प्रमाण अधिक होतं. * इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केलेल्या एकूण सेल्फीजपैकी ५७ टक्के सेल्फीज या १८ ते ३५ वर्षे वयोगटातील नागरिकांनी पोस्ट केलेल्या होत्या. तर १८ वर्षे वयोगटाखालील नागरिकांच्या सेल्फीजचं प्रमाण होतं ३० टक्के. ३५ पेक्षा अधिक वयवर्षे असलेल्या नागरिकांचे सेल्फी पोस्ट करण्याची वारंवारताही कमी म्हणजे १३ टक्के होती.* स्वत:चा लूक, आपण छान दिसतोय ना? ही उत्सुकता हीच एक गोष्ट या सगळ्या सेल्फीजमध्ये कॉमन होती . * याव्यतिरिक्त या सेल्फीजमधील चेहरे खरेखुुरे आहेत का? हे देखील तपासण्यात आले. त्यातही ५० टक्के सेल्फी फेल ठरल्या. काही स्पॅम, ब्लॅन्क इमेजेस होत्या तर काहींनी जास्त फॉलोअर्स मिळावेत म्हणून हॅशटॅगचा वापर केलेला होता. तर असा हा सेल्फीजचा आॅनलाईन केलेला सर्व्हे होता.