अलिकडे बदलत्या लाइफस्टाइलमुळे मोठ्यांना आतापर्यंत मोठ्यांची समजली जाणारी समस्या लहानांमध्ये बघायला मिळत आहे. ती समस्या म्हणजे ब्लड प्रेशर. कमी वयातही अनेकजण ब्लड प्रेशरचे शिकार होत आहेत. कामाचा वाढता ताण, वेगवेगळ्या चिंता, धावपळ, आहारातील बदल यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणंही आव्हानच आहे. त्यामुळे सतत डॉक्टरांकडे जाऊन बीपी चेक करावा लागतो. पण आता बीपी चेक करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
आता ब्लड प्रेशर किती आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही. कारण टोरांटो युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी मोबाइल फोनच्या माध्यमातून बीपी चेक करण्याची नवीन पद्धत विकसित केली आहे. यानुसार सेल्फी व्हिडीओच्या मदतीने ब्लड प्रेशर जाणून घेतलं गेलं. वैज्ञानिकांनुसार, चीन आणि कॅनडातील १३२८ लोकांवरील निरिक्षण करतेवेळी ९५-९६ टक्के स्पष्ट माहितीसह तीन प्रकारचे ब्लड प्रेशर मोजण्यात यश मिळालं आहे.
हे तंत्रज्ञान कसं करतं काम?
टोरांटो युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक पॉल झेंग यांनी ट्रान्सडर्मल ऑप्टिकल इमेजिंग तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहऱ्याच्या स्कॅनिंगने ब्लड प्रेशरची माहिती मिळवली जाऊ शकते. वैज्ञानिकांनी हे समजून घेण्यासाठी दोन मिनिटांच्या सेल्फी व्हिडीओचा वापर केला.
हा व्हिडीओ तयार करतेवेळी मोबाइलमध्ये लावण्यात आलेले ऑप्टिकल सेंसर चेहऱ्यावर पडणाऱ्या ला किरणांना कॅप्चर करते, जे त्वचेच्या खाली हीमोग्लोबिनमुळे रिफ्लेक्ट होतात. ट्रान्सडर्मल ऑप्टिकल इमेजिंग तंत्रज्ञान याच परावर्तित किरणांच्या मदतीने रक्ताच्या दबावाची माहिती मिळवते. वैज्ञानिकांची दावा आहे की, हे तंत्रज्ञान ९६ टक्के स्पष्ट परिणाम देते.
वैज्ञानिकांनुसार, ट्रान्सडर्मल ऑप्टिकल इमेजिंग तंत्रज्ञान जगात वाढत्या हायपरटेंशन(हाय बीपी)च्या समस्येला कमी करण्यात मदत करेल. खासकरून अशा ठिकाणांवर जिथे आरोग्य सेवा सहजपणे उपलब्ध होत नाहीत. जर तुमच्याकडे फोन किंवा कॉम्प्युटर असेल तर बीपीची माहिती समोर आल्यावर तुम्ही डॉक्टरांशी थेट बोलणी करू शकता. याप्रकारे लोकांमध्ये जागरूकताही वाढू शकते.
न्यूरालॉजिक्स या टेक कंपनीने एनुरा नावाचं एक अॅप रिलीज केलं आहे, जे ३ मिनिटांच्या सेल्फी व्हिडीओतून हृदयाचे ठोके आणि तणावाचा स्तर याची माहिती देतं. कंपनी लवकरच या अॅपमध्ये ब्लड प्रेशरची माहिती देणारं फीचर टाकेल. जे चीनसाठी आधी रिलीज केलं जाणार आहे. कंपनीचे फाउंडर ली म्हणाले की, यूजरच्या आरोग्याशी संबधित आकडे अॅप क्लाउडवर अपलोड केले जातील. लवकरच याच्या मदतीने कोलेस्ट्रॉल, हीमोग्लोबिन आणि ब्लड ग्लूकोजच्या स्तराची माहिती मिळेल.