मनुष्यच काय तर जनावरं देखील रडतात तेव्हा त्यांच्याही डोळ्यातून पाण्याचे अश्रू येतात. पण एका महिलेच्या डोळ्यातून क्रिस्टलचे (पारदर्शक पदार्थ) अश्रू येतात. या महिलेची ही समस्या पाहून डॉक्टरही हैराण झाले असून या महिलेला नेमकं झालं काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
ही महिला अर्मेनियातील स्पेंडरियन गावात राहणारी असून तिचं नाव सॅटेनिक काजेरियन आहे. काजेरियनचं म्हणणं आहे की, तिचं कुटूंब शेती करून आपलं पोट भरतं. अशात त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत की, ते या विचित्र आजारावर उपचार करू शकतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २२ वर्षीय काजेरियनच्या डोळ्यातून दररोज अश्रू ऐवजी ५० क्रिस्टल निघतात. तिचा हा आजार डॉक्टरांच्या देखील लक्षात येत नाहीये. त्यामुळे ते योग्य ते उपचार करू शकत नाहीत आणि ऑपरेशनही करू शकत नाहीत.
काजेरियनने सांगितले की, सुरूवातीला तिने डोळ्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यात टाकण्यासाठी औषधांचा वापर केला होता. ज्याने थोडा आराम मिळाला होता. पण आता तिला क्रिस्टल अश्रूंमुळे तिला फार जास्त अडचणींचा सामना करावा लागतोय.
रशियातील एका नेत्र तज्ज्ञांनी सांगितले की, महिलेचा आजार सामान्य नाहीये. हा आजार समजून घेणंही कठीण आहे. त्यांनी या आजाराबाबत असा अंदाज व्यक्त केला की, अश्रूंमध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्याने असा आजार होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच जेव्हा अश्रूंमध्ये मिठाचं प्रमाण वाढतं, तेव्हा ते क्रिस्टलमध्ये रूपांतरित होतात.
तर दुसरीकडे अर्मेनियाचे उप-आरोग्य मंत्री ओगेंस अरूटुयन यांचं म्हणणं आहे की, महिलेच्या या अजब आजाराचा शोध घेतला जात आहे. महिलेसोबत असं का होत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.