Monsoon Food Tips: पावसाला काही भागांमध्ये नुकतीच सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना असह्य उकाड्यातून थोडातरी दिलासा मिळाला आहे. पावसाळा आला की, सोबत काही आजारांनाही घेऊन येतो. त्यामुळे दिवसांमध्ये आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे. सामान्यपणे उन्हाळ्यात भरपूर लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दह्याचं भरपूर सेवन करतात. पण आता पावसाळ्यात दही खावं की नाही? असा प्रश्न काही लोकांना पडतो.
आयुर्वेदानुसार, वातावरण बदलताच आपल्याला आहारातही बदल करायला हवा. असं केलं नाही तर त्या आहाराचे गुण बदलतात आणि त्यांचे फायदे होण्याऐवजी नुकसान अधिक होतात. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, पावसाळ्यात पोटातील पचन अग्नि कमजोर होते. अशात आहारात बदल करणं गरजेचं असतं. जे आपल्या शरीराला उष्णता देतील आणि पचनक्रियेत मदत करतील असेच पदार्थ खायला हवेत. पावसाळ्यात दही खावं की नाही याबाबत आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पावसाळ्यात दही खावं की नाही?
डॉक्टर विलास शिंदे यांच्यानुसार, पावसाळ्यात दही खाणं टाळलं पाहिजे. या दिवसांमध्ये दही खाल्लं तर कफ तयार होतो, ज्यामुळे खोकला आणि सर्दी होते. सोबतच पचनक्रियाही योग्यप्रकारे होत नाही. पावसाळ्यात या पदार्थांचं सेवन केलं तर घसा खराब होतो, पोटात गडबड होते आणि तापही येऊ शकतो. डॉक्टर म्हणाले की, जर तुम्हाला या दिवसात दही खायचंय असेल तर त्यात साखर टाकून खावे. तसेच रात्री दही अजिबात खाऊ नये. असं केल्याने पोटासंबंधी समस्या होऊ शकतात.
पावसाळ्यात काय खावे?
आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी आलं, सुंठ, हींग, काळे मिरे आणि गव्हाच्या चपात्या यांचं सेवन करावं. पावसाळ्यात शरीरातील दोष दूर करण्यासाठी चटकदार आणि गोड पदार्थ खावेत.