ऋतू बदलला की आहारात बदल करणे हे आलेच. थंडी पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे रोजच्या जेवणातील काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. ताज्या ताज्या भाज्या आणि गरम पदार्थ थंडीत खायला मजा येते. मात्र काही पदार्थ टाळावेही लागतात. जसे की दही. उन्हाळ्यात दही खायची सवय झालेली असताना अचानक दही खाणं सोडायचं तसं अवघडच. तरी थंडीत दह्याचे सेवन घातक असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. आधीच वातावरण थंड आणि त्यात दही खाल्ले तर घसा खराब होण्याची आणि परिणामी सर्दी होण्याची शक्यता असते.दही खाण्याबाबत आयुर्वेदाचा सल्ला काय?
आयुर्वेदात सांगितले आहे की थंडीत दही खाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणे. दही मूळत: थंड असते ज्यामुळे सर्दी आणि इतर आजार उद्भवू शकतात. जर आधीच सर्दी असेल तर दह्यामुळे आणखी गंभीर आजार होणे स्वाभाविक आहे. जर नवीन आजारांना आमंत्रण द्यायचे नसेल तर काही महिने दह्यापासून दूर राहिलेले बरे.महत्वाचे म्हणजे घशाशी असलेला कफ दही खाल्ल्याने आणखीनच वाढण्याची शक्यता असते. ज्यांना दमा आहे त्यांनी सुद्धा दह्याचे सेवन करू नये अशी माहिती वैद्य परीक्षित शेवडे यांनी दिली.विज्ञान सांगते दही खाण्याचे फायदे
याउलट विज्ञानात मात्र काही प्रमाणात दह्याचे सेवन चालेल असा सल्ला दिला आहे. दह्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियमचे प्रणाम अधिक असते. तसेच दह्यात बॅक्टेरिया असतात जे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.दुपारच्या जेवणात काही प्रमाणात दही खाणे उत्तमच मात्र सर्दी आणि कफचा त्रास असल्यास दही टाळणे योग्य.
याचा अर्थ थंडीत आपली तब्येत बघूनच दही खायचे की नाही हे ठरवा. दही कितीही आवडत असले तरी आजाराला निमंत्रण देऊ नका एवढेच.