कधी काही चुकीचं किंवा जास्त खाल्याने तुम्हाला अपचनाची समस्या होते यात काहीच दुमत नाहीये. अॅसिडीटी, ब्लोटिंग किंवा अपचन यांसारख्या समस्यांमुळे अनेकदा अस्वस्थ वाटू लागतं. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोकं डॉक्टरांचा सल्ला घेतात किंवा बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या औषधांचा आधार घेतात. कालांतराने काही लोकांना सतत ही औषधं घेण्याची सवयच लागते. पण हिच सवय तुम्हाला महागात पडू शकते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून खुलासा करण्यात आला आहे की, गॅस आणि अॅसिडीटीसाठी सतत घेतली जाणारी औषधं आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
तुम्हीही बाजारात मिळणाऱ्या Pan-40 आणि Razo-D यांसारख्या औषधांचे सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या संशोधनातून याबाबत खुलासा करण्यात आला आहे की, ज्या व्यक्ती पोटासंबंधिच्या औषधांचं सतत सेवन करतात. त्यांना पोटात होणाऱ्या बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. बॅक्टेरियामुळे होणाऱ्या इन्फेक्शनमुळे सतत पोटाच्या समस्या उद्भवतात आणि मोठ्या आतड्यांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
मोठ्या आतड्यांमध्ये क्लोस्टिडियम डिफिसिले कोलाइटिसचं संक्रमण वाढतं. याला वैद्यकिय भाषेमध्ये 'सी-डिफ' असं म्हणतात. सी-डिफ इन्फेक्शनमुळे मोठ्या आतड्यांमध्ये जीवाणुंचं विघटन होण्यास सुरुवात होते. काही रूग्णांमध्ये अधिकाधिक अॅन्टीबायोटिक्सच्या सेवनामुळेसुद्धा ही समस्या उद्भवते. आणखी एक गोष्ट संशोधनातून सिद्ध झाली की, एखाद्या 'सी-डिफ इन्फेक्शमुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींनी गॅस आणि अॅसिडिटीच्या औषधांचे सेवन करण्यास सांगितले तर हे इन्फेक्शन कमी होण्याऐवजी पुन्हा वाढते.
संशोधनामध्ये एक गोष्ट लक्षात आली की, गॅस आणि अॅसिडीच्या औषधांच्या सेवनाने सी-डिफचा धोका आणखी वाढतो. हे संशोधन जामा इंटर्नल मेडिसिनमध्ये करण्यात आलं आहे.