भाज्यांची चव वाढवण्यासाठी खासकरून भारतीय जेवणात आल्याचा वापर केला जातो. परंतु केवळ खाण्यासाठीच नाही तर घसा खवखवत असेल तर उपचार करण्यासाठी आणि इतरही काही गोष्टींसाठी आलं वापरलं जातं. आल्याचे जसे फायदे आहेत. तसे काही तोटे देखील आहेत. आल्याचा जास्त वापर तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.
बहुतेक लोक सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही चहाला नाही म्हणत नाहीत. त्यात आल्याचा चहाही मिळत असेल तर मस्तच. आल्याचा चहा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. पण काही लोकांनी आल्याचा चहा अजिबात पिऊ नये किंवा तुम्ही जर पित असाल तर तो कमी प्रमाणात प्यायला हवा. जास्त प्रमाणात आल्याचा वापर केल्यास काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया...
उष्ण वातावरणात गरम चहा प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. आलं उष्ण असतं, त्यामुळे उन्हाळ्यात ते खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
आल्याच्या अतिसेवनाचे तोटे
पोटात जळजळ होणे
आलं शरीराला ऊब देत असलं तरी त्याचं जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ होते, एसिड तयार होते, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र, कमी प्रमाणात सेवन केल्यास पोटासंबंधीत समस्या कमी होऊ शकतात.
ब्लड क्लॉटिंगवर परिणाम
आल्यामध्ये रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात. त्याचं जास्त सेवन केल्यास रक्त पातळ होऊ शकतं. रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्या लोकांच्या समस्या यामुळे वाढू शकतात.
ब्लड शुगर लेव्हल होते कमी
जास्त प्रमाणात आल्याचा वापर केल्यास इन्सुलिनच्या पातळीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते.
तोंड येणं
आल्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास तोंड येऊ शकतं. त्यामुळे योग्य प्रमाणात आहारात आल्याचा वापर करणं गरजेचं आहे.