हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला आपल्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेकवेळा आरोग्याशी संबंधित समस्या डोकं वर काढतात. याचप्रमाणे शरीरात युरिक अॅसिडचं (Uric Acid) प्रमाण वाढलं, तर तेदेखील आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आहार नीट नसेल तर शरीरातलं युरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. जेव्हा आपल्या शरीरात प्युरीन नावाचे केमिकल कंपाउंड मोठ्या प्रमाणात तयार होते, तेव्हा युरिक अॅसिड तयार होऊ लागतं. त्या वेळी किडनी (Kidney) शरीरात तयार होणारे अतिरिक्त विषारी पदार्थ (Toxins) फिल्टर करू शकत नाही आणि ते रक्तात मिसळून शरीराच्या सांध्यातल्या गॅपमध्ये जमा होऊ लागतं. यामुळेच सांध्यांमध्ये जडपणा, वेदना आणि सूज येण्याची समस्या उद्भवते.
युरिक अॅसिड तयार होण्यापासून वेळीच रोखलं नाही तर संधिवात (arthritis) होण्याची शक्यता बळावते. नंतर उठणं, बसणं आणि चालणंही कठीण होऊन जातं. आज आम्ही तुम्हाला अशा तीन भाज्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या सांधेदुखीवर नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. या भाज्या कच्च्या खाल्ल्याने युरिक अॅसिड लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतं. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'डीएनए हिंदी'ने दिलं आहे.
कांदा, टोमॅटो आणि लिंबू या तीन भाज्या रोज कच्च्या सॅलडप्रमाणे खाण्याची सवय लावली, तर शरीरात जमा झालेलं युरिक अॅसिडही बाहेर पडेल. तसंच ते बनण्याची प्रक्रियाही कमी होईल. दररोज किमान 100 ग्रॅम कांदे, दोन लिंबू आणि तीन ते चार टोमॅटोचं सेवन सांधेदुखीवर औषधांप्रमाणे काम करतं.
टोमॅटोयुरिक अॅसिडची वाढती पातळी कमी करण्यासाठी भाज्यांप्रमाणेच फळंही अत्यंत उपयुक्त आहेत. टोमॅटोमध्ये (Tomato) फायबर्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ते शरीरातलं डिटॉक्सिफिकेशन करायला, तसंच युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करतं.
कांदायुरिक अॅसिड कंट्रोल करण्यासाठी, शरीरातलं मेटाबॉलिझम योग्य असणं महत्त्वाचं आहे. कांद्यामध्ये (Onion) फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, सी आणि ई, तसंच सल्फर मुबलक प्रमाणात असतं. अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त असलेला कांदा युरिक अॅसिडवर औषधाप्रमाणे काम करतो. कांद्यामध्ये असलेले घटक शरीरात नॉर्मल प्रोटीनचं प्रमाण वाढवतात. त्यामुळे शरीरात प्युरिन कमी प्रमाणात तयार होतं.
लिंबूदररोज 500 मिलीग्राम व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यास शरीरात युरिक अॅसिड तयार होण्याची प्रक्रिया कमी होईल. लिंबामध्ये (Lemon) असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म सूज आणि आखडलेपणा कमी करतात. लिंबू शरीर डिटॉक्स करण्यासाठीदेखील खूप उपयुक्त आहे.
कांदा, टोमॅटो आणि लिंबू कच्चं खायला आवडत नसेल, तर तिन्ही ब्लेंडरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा. नंतर ते स्मूदीप्रमाणे खा किंवा त्याचा रस प्या. रिकाम्या पोटी त्याचं सेवन केल्यास युरिक अॅसिड झपाट्याने कमी होतं.