निरोगी आयुष्यासाठी झोप (Sleep) फार महत्त्वाची आहे. योग्य झोप झाली की थकवा तर दूर होतोच शिवाय अनेक आजारांपासून आपण दूर राहतो. सामान्यपणे माणसाला रात्रीची सात ते आठ तासांची झोप मिळणं अत्यंत आवश्यक आहे. पण अनेकदा कामाचा ताण किंवा इतर कारणांमुळे लोक रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी कामावर जाण्यासाठी लवकर उठावं लागत असल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. या सगळ्यात काही लोक असेही असतात ज्यांना कितीही झोप मिळाली तर ती अपुरीच असते. फार कमी लोकांना माहीत आहे की, अतिरिक्त झोप घेतल्याचे अनेक तोटे आहेत, शिवाय यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. अशाच काही तोट्यांबद्दल आपण जाणून घेऊयात.
डायबेटिसजास्त झोपेमुळे आपल्या शरीराची यंत्रणा बिघडते आणि ब्लड शुगरवर (Blood Sugar) परिणाम होतो. जर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसेल तर एक दिवस तुम्हाला मधुमेह (Diabetes) होऊ शकतो. त्यामुळे अतिझोप घेऊ नये. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.
वजन वाढणंकाही लोक खूप झोपतात. म्हणजे रात्री पूर्ण झोप घेतल्यानंतरही ते दुपारी झोपतात. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रात्री आणि दुपारीही झोप घेतल्यामुळे तुमचं वजन (Weight) वाढू शकतं आणि तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त झोप घेणं टाळा.
थकवापुरेशी झोप घेतल्याने शरीराचा थकवा दूर होतो हे खरंय, पण जास्त झोप घेतल्याने थकवा जाणवू शकतो, असंही अभ्यासात दिसून आलंय. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही रात्री कमीतकमी 7 तास आणि जास्तीतजास्त 9 तासांची झोप घेतली पाहिजे. त्यापेक्षा जास्त आणि त्यापेक्षा कमी झोप ही आरोग्यासाठी चांगली नसते.
हृदयासंबंधित आजारआरोग्य तज्ञांच्या मते, जास्त झोपेमुळे शरीराची सिस्टिम बिघडते. अनेकांना हृदयाशी संबंधित समस्या (heart disease) किंवा आजार असतात, त्यामुळे ठराविक तासांचीच झोप घ्यावी, अतिरिक्त झोप घेतल्यास तुमचा हृदयासंबंधी त्रास वाढू शकतो.
वयोगट आणि झोपेचे तासझोप ही वयोमानानुसार घेतली जावी. जर तुमचं वय 50 ते 60 एवढं किंवा त्याहून जास्त आहे तर तुम्हाला रात्री सहा ते आठ तासांची गाढ झोप घेणं आवश्यक आहे. पण जर तुमचं वय 20 वर्षं किंवा त्याहून जास्त आहे तर तुम्हाला रात्रीची सात तासांची झोप घेतली पाहिजे. काहीवेळा तुम्ही एखाद्या गोष्टीवरून चिंतेत असता तेव्हा वेळेवर झोपण्याची सवय बिघडते. याचा शरीरावर फार वाईट परिणाम होतो. म्हणून झोप योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणं आवश्यक आहे.