Kidney Disease Sign : किडनी आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. शरीरातील वेगवेगळ्या कामांमध्ये किडनींची महत्वाची भूमिका असते. किडनीमुळे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात. तसेच शरीरातील खनिजाचं संतुलन रेग्यूलेट करण्याचं आणि लाल रक्त पेशींची निर्मिती वाढवणाऱ्या हार्मोन्सना तयार करण्याचं काम किडनी करतात. पण किडनींमध्येही आपल्याच काही चुकांमुळे समस्या होतात.
किडनीमध्ये समस्या असेल तर शरीर काही संकेत देतं. ज्याकडे वेळीच लक्ष दिलं तर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो. अनेकदा या समस्या जीवघेण्याही ठरू शकतात. अशात या संकेतांना ओळखणं गरजेचं असतं.
दिवसभर थकवा
एनएचएसनुसार, जर तुम्हाला अलिकडे जास्त थकवा जाणवत असेल तर याचं कारण तुमची किडनी योग्यप्रकारे काम करत नसल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्या कारणाने होऊ शकतं. विषारी पदार्थ आपल्या शरीरातील इतर जैविक क्रिया प्रभावित करण्याचं काम करतात आणि इतरही अनेक समस्या निर्माण करते.
पुरेश झोप न घेणं
शरीराला आवश्यक तेवढी झोप घेतली नाही तर अनेक समस्या होतात. तेच किडनीची समस्या हेही याचं एक कारण असू शकतं. स्लीप एपनिया किंवा चांगली झोप येत नसेल तर किडनीमध्ये समस्या आहे असं समजा. अशात जर तुम्हाला सतत चांगली झोप येत नसेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा.
कोरडी, खाज असलेली त्वचा
कोरडी आणि खाज असलेली त्वचा विनाकारण बराच काळ राहिली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. तसेच किडनीसंबंधी टेस्ट करून घ्या. विषारी पदार्थ शरीरात जमा झाल्याने खनिज आणि इतर पोषक तत्वांचं प्रमाण बिघडतं. ज्यामुळे नंतर त्वचा आणि हाडांचं नुकसान होतं.
पायांवर सूज
किडनीमध्ये समस्या असेल तर शरीरातील विषारी पदार्थ पूर्णपणे बाहेर निघत नाहीत. ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. याचप्रमाणे जेव्हा शरीरातून सोडिअमचं अतिरिक्त प्रमाण बाहेर निघत नाही. तेव्हा पायांवर, टाचांवर आणि तळपायांवर सूज येते. पायांवर सूज येण्याची इतरही आणखी काही कारणे आहेत. पण सल्ला हाच दिला जातो की, पायांवर सूज येत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
डोळ्यांवर सूज
जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला सूज आलेली दिसत असेल तर लगेच किडनीची टेस्ट करा. ही समस्या सामान्यपणे किडनीतील समस्येमुळे होते. कारण किडनी खराब झाल्यावर प्रोटीन लघवीद्वारे बाहेर निघून जातं.
श्वास घेण्यास त्रास
जेव्हा किडनीमध्ये काही समस्या होते तेव्हा रूग्णाला योग्यप्रकारे श्वास घेता येत नाही. हे एरिथ्रोपोइटिन नावाच्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतं. वेबएमडीनुसार, एरिथ्रोपोयटिन हार्मोन आपल्या शरीराला लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी संकेत देतात. त्याशिवाय तुम्हाला एनीमिया होऊ शकतो आणि श्वासासंबंधी समस्याही होऊ शकते.
जास्त वेळा लघवी लागणे
अनेकदा लघवीला जास्त जावं लागण्याला किडनीसंबंधी समस्येशी जोडलं जातं. जर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जास्त वेळा लघवीला जावं लागत असेल तर उशीर न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.