डोकेदुखी ही बाब सामान्य असली तरी त्याच्या वेदना मात्र असहय्य असतात. डोकेदुखीची अनेक कारणे असतात. काहीवेळा ही डोकेदुखी अचानक उद्भवते आणि तुमचा जीव नकोसा करून टाकते. आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि घरगुती असे रामबाण उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची डोकेदुखी लगेच गायब होईल.
-आल्याचा उपयोग डोकेदुखीसाठी रामबाण म्हणून केला जातो. आल्यामुळे डोक्याच्या पेशींमध्ये आलेली सूज कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदात आल्याच्या गुणांवर विशेष भर देण्यात आला आहे. अचानक उद्भवलेली डोकेदुखी दूर पळवण्यासाठी आलं अत्यंत गुणकारी ठरतं. शिवाय याचे परिणामसुद्धा चकित करणारे आहेत. त्यासाठी तुम्हाला एक टीस्पून लिंबाचा रस आणि तेवढाच आल्याचा रस एकत्र करून ते मिश्रण सेवन करावं. दिवसातून दोनदा हे मिश्रण घेतल्याने डोकेदुखी दूर पळते. आल्याचा दुसरा उपाय करताना आल्याची एक चमचा पेस्ट बनवून त्यात दोन चमचे पाणी मिसळावं आणि ती पेस्ट कपाळावर लावावी. काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावी.
-जेव्हा अचानक डोकेदुखी उद्भवते तेव्हा लवंग खूप उपयुक्त ठरते. लवंग आणि लवंगेच्या तेलात वेदनाशामक गुण असतात. १०-१५ लवंगांची पारीक पूड करा. ही पूड एका कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. वेदना कमी होतात. दोन चमचे खोबरेल तेल त्यामध्ये एक चमचा मिठ आणि चार-पाच थेंब लवंग तेल मिसळून ते हलक्या हाताने कपाळाला लावावं. याने त्वरीत आराम मिळतो.
-दालचिनीत भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. डोकेदुखीची समस्या जाणवेल तेव्हा दालचिनीचे दोन-तीन तुकडे घेऊन त्यांचं चूर्ण करावं. त्यात थोडं पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करावी आणि ती कपाळाला लावावी. हा लेप साधारण अर्धा तास राहू द्यावा, त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावं.
-डोकेदुखीला पळविण्यासाठी लिंबू खूप उपयुक्त आहे. म्हणून कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते सेवन करावं. जर गॅसेसचा त्रास होत असेल तर या उपायाने नाहीसा होईल. त्यात सेंधे मीठ टाकल्याने डोकेदुखी आणि अपचनापासून मुक्ती मिळते.
-सर्दी, खोकला किंवा सायनसमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर एक चमचा ओवा भाजून तो सुती कपड्यात बांधावा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी त्याने शेकावं. यामुळे डोकेदुखीचा त्रास त्वरित कमी होतो.