पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण हळूहळू यंत्राने अनेक कामं सोपी झाली आणि आज बटण दाबल्याने खूप कामं क्षणार्धात होतात. ऑफिसमध्ये ८ ते १० तास काम असो किंवा वर्क फ्रॉम होम असो खुर्ची आपल्यासोबत असते. पण तुम्हाला खुर्चीवर सतत बसून राहण्याचे तोटे माहीत आहेत का?
डिजिटल युगात, प्रत्येक व्यवसायातील लोक खुर्चीवर बसून जास्त वेळ काम करतात. तुम्ही घरातून किंवा ऑफिसमधून काम करत असाल, तर ते खुर्चीवर बसूनच करावं लागतं. सतत खुर्चीवर बसणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे अनेक रोगांना आमंत्रण देण्यासारखं आहे.
'या' आजारांचा धोका
जर तुम्ही जास्त वेळ खुर्चीवर बसून काम करत असाल तर तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात आणि कोणते उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकता याबाबत जाणून घेऊया... जास्त वेळ खुर्चीवर बसल्याने पाठ आणि मान दुखू शकते. बराच वेळ बसल्याने पाठीच्या कण्यावर दाब पडतो. याशिवाय खांदे जड होतात. जी काही काळानंतर कायमची समस्या बनते.
या समस्यांपासून सुटका होणं थोडं कठीण आहे. याशिवाय जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. जास्त वेळ खुर्चीवर बसल्याने मानसिक तणाव निर्माण होतो. अनेक वेळा असं होतं की कामाच्या प्रेशरमुळे लोक कामातून सुट्टी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. तुम्हाला थकवा जाणवतो.
हा त्रास कसा टाळायचा?
- काम करताना दर अर्ध्या तासाने ५ ते १० मिनिटे ब्रेक घेतला पाहिजे. असे केल्याने थकवा कमी होईल, तसेच शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहील.
- जर तुम्हाला ७ ते ८ तास खुर्चीवर बसावं लागत असेल तर तुम्ही चांगली खुर्ची निवडा, जेणेकरून बॅक पोर्शन नीट राहिल. याशिवाय खुर्ची जास्त उंच नसावी हेही लक्षात ठेवा. तुमच्या पायाचे तळवे जमिनीवर असावेत.
- वेळोवेळी पाणी प्यायला हवं. यामुळे तुमचं मेटाबॉलिज्म उत्तम राहतंच शिवाय शरीराला फ्रेश वाटतं.
- पौष्टिक आहार घ्या, जंक फूड टाळा. हे साधे उपाय करून तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता.