सुंदर दिसावे म्हणून वाढत्या वयानुसार स्त्रिया मेक अपचा आधार घेतात. परंतु काही जणींची त्वचा वाढत्या वयातही तुकतुकीत आणि तजेल दिसते. काही जणींना ती नैसर्गिक देणगी असते तर काही जणींची त्यामागे असते अपार मेहनत. तुम्हाला नैसर्गिक वरदान मिळाले नसेल तर प्रयत्नपूर्वक तुम्ही तुमची त्वचा उजळ आणि सतेज ठेवू शकता. त्यासाठी काही सवयी वेळेतच बदला आणि काही दिवसात फरक बघा.
त्वचा सुंदर, नितळ ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील दीर्घकाळ परिणाम देणारे ठरू शकतील. अट एवढीच की त्यात सातत्य हवे. आणि त्यासाठी स्वतःला रोज थोडा वेळ द्यायला हवा. ही अट मान्य असेल तरच पुढील उपाय तुमच्यासाठी-
मेकअपशिवायही तुम्ही सुंदर दिसू शकता. त्यासाठी पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे त्वचा स्वच्छ ठेवणे. तुम्ही मेकअप केला नसेल पण तुमची त्वचा स्वच्छ असेल तरीदेखील बिना मेकअपचे तुम्ही आकर्षक दिसू शकता. यासाठी सौम्य क्लींजर आणि फेसवॉशने त्वचा स्वच्छ धुवा. बाहेरून आल्यावर किंवा घरी असतानाही दिवसातून दोनदा फेसवॉशने आपली त्वचा स्वच्छ धुवा. अन्यथा, चेहऱ्यावर पुरळ तसेच मुरूम येऊ शकतात.
स्किन केअर रूटीनचे पालन करा- मेकअपशिवाय सुंदर दिसण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घ्या. चेहरा स्वच्छ केल्यानंतर टोनर वापरा. टोनर नंतर सीरम लावा. आणि मग मॉइश्चरायझर लावा. वरीलपैकी कोणते प्रोडक्ट तुमच्या त्वचेला मानवत नसतील तर दूध, साय, हळद आणि बेसन पिठाचे मिश्रण एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्याला लावा. चेहऱ्याइतकीच हातापायाची काळजी घ्या. शक्य असल्यास लोशन किंवा तेलाचा वापर करून मसाज करा.
त्वचेतून मृत पेशी काढून टाका : डेड स्किनमुळे त्वचेचा रंग खराब झालेला दिसतो. चेहऱ्याचे टॅनिंग घालवण्यासाठी टोमॅटोचा रस, बटाट्याचा रस, काकडीचा रस यांचा लेप लावा. पार्लरमध्ये जात असाल तर फेशिअल करून घ्या. त्या मसाजमुळे सुद्धा त्वचा श्वास घेते आणि तजेलदार होते.
या गोष्टीही लक्षात ठेवा-
निरोगी त्वचेसाठी पुरेशी झोप घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागतात. तसेच झोप कमी झाल्यामुळे त्वचेवर सूज येऊ शकते. त्यामुळे रोज चांगली झोप घ्या. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि अति तेलकट, तिखट पदार्थांचे सेवन टाळा. संतुलित आणि सात्त्विक आहार घ्या!