शरीरात एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक दिवसातून 2 ते 3 वेळा जेवतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता. कारण रात्रीच्या जेवणातून मिळाणारी ऊर्जा आणि पोषक तत्व सकाळपर्यंत शरीराच्या इतर क्रियांमध्ये खर्च होऊन जातात. ज्यामुळे सकाळी फार भूक लागते. ऑफिसला जाणं असो किंवा शाळेत जाणं, नाहीतर घरातील कामच असली तरिही सकाळच्या धावपळीमुळे आपल्यापैकी अनेकजण सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात. याचा शरीरावर लगेच कोणता प्रभाव दिसून येत नाही परंतु, कालांतराने शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया नाश्त्याकेडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला होणारे नुकसान...
डोकेदुखीने त्रस्त
जर तुम्ही नेहमी सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी फार कमी होते. कारण त्यावेळी तुम्ही 8 ते 10 तास काही खात नाही. त्यामुळे डोक्यामध्ये असे काही हार्मोन्सचे उत्सर्जन सुरु होते जे डोकेदुखीसाठी जबाबदार ठरतात.
टाइप 2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक
ज्या व्यक्ती नेहमी सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा धावपळीमध्ये अर्धवट नाश्ता करून निघून जातात, त्यांना टाइप 2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो आणि डिप्रेशन, टेन्शन, अस्वस्थपणा यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. ब्लड शुगरची लेव्हल सतत असंतुलित राहिल्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हलवरही परिणाम होतो. याचे परिणाम शरीरासाठी घातक ठरू शकतात.
दिवसभर सुस्ती आणि थकवा
जर तुम्ही सकाळचा नाश्ता अर्धवट सोडून जात असाल तर तुम्हाला सतत थकवा जाणवतो. जरी तुम्ही रात्री भरपेट जेवण केलं असेल तरिही सकाळी पोट नव्याने पोषक तत्वांसाठी तयार असते. नाश्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिवसभरासाठी कमी ऊर्जा मिळते. परिणामी आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो.
स्थुलपणा वाढतो
अनेक लोकांचा हा समज असतो की, कमी जेवल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक लोकं खाण टाळतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? नाश्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमचा स्तुलपणा वाढण्याचीही शक्यता अधिक असते. हे लठ्ठपणापेक्षाही फार गंभीर आहे. कारण लठ्ठपणामध्ये तुमचं पोट आणि चरबी वाढते. परंतु स्थुलपणामध्ये तुमचं शरीर आतून कमजोर होतं.
रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
आहार तज्ज्ञांनी सांगितलं की, पोटभर नाश्ता करणं फार गरजेचं असतं. यामुळे शरीरामध्ये पूर्ण दिवस एनर्जी राहते. परंतु नाश्ता न केल्यामुळे एनर्जीसोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. कारण उपाशी राहिल्यामुळे तुमच्या शरीरातील सेल्स डॅमेज होऊ लागतात. त्यामुळे शरीरावर वायरस, बॅक्टेरिया, फंगल इन्फेक्शन यांसारख्या अनेक समस्या उद्भवण्याचा धोका असतो.