देशात कॅन्सरप्रमाणेच आता हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. कार्डिएत अरेस्ट आणि हार्ट अटॅकने अचानक लोक मरत आहेत. कमी वयात यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. हार्ट डिजीजवर सध्या अनेक ठिकाणी रिसर्च सुरू आहे. आता एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, सात तासांपेक्षा कमी झोपेमुळे हृदयासंबंधित आजाराचा धोका तीन पटीने वाढतो. जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटलमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे.
रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की 7 तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने शरीरातील एंडोथेलियल सेल्सची क्रिया कमी होते. ते कमी झाल्यामुळे हृदयाच्या धमन्यांचा विस्तार कमी होऊ लागतो, त्यामुळे अटॅक येण्याचा धोका असतो. रिसर्चमध्ये हृदयविकार असलेल्या लोकांच्या झोपेची पद्धत पाहण्यात आली. हार्ट डिजीज असलेल्या 23 टक्के रुग्णांना 6 तासांपेक्षा कमी झोप मिळत असल्याचे आढळून आले. यावरून संशोधकांनी झोपेच्या कमतरतेचा शरीरावर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन केले.
8 तास झोप आवश्यक
कार्डिओलॉजिस्ट डॉ. अजित जैन यांच्या मते, झोप न मिळाल्याने बॉडी क्लॉक बिघडतो, ज्यामुळे हाय बीपीची समस्या उद्भवू शकते. बीपी वाढल्याने थेट हृदयविकार होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे अधिक समस्या उद्भवतात, जसे की एखाद्या व्यक्तीला दिवसभर कमी ऊर्जा जाणवते. तो दिवसभर जांभई देत राहतो. झोप न मिळाल्याने लठ्ठपणाही वाढतो. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचाही धोका असतो. अशा परिस्थितीत हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी किमान 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. याशिवाय सकस आहार घेणेही महत्त्वाचे आहे. जंक फूड आणि जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.
'अशा' प्रकारे घ्या चांगली झोप
झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिऊ नका.
झोपण्याच्या 3 तास आधी थोडा व्यायाम करा.
लाईट बंद करून झोपा.
जर तुम्हाला झोप येत नसेल तर 15 ते 20 मिनिटे चाला.
दिवसा न झोपण्याचा प्रयत्न करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.