(Image Credit : Live Science)
वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे नेहमी सांगितली जातात. सतत यावर वेगवेगळे रिसर्चही केले जातात. मग लोक त्यानुसार वजन कमी करण्यासाठी काही उपाय करण्याचा प्रयत्न करतात. पण अनेक तज्ज्ञ सांगतात की, वजन कमी करण्यासाठी आधी वजन का वाढलं याचं कारण शोधा आणि त्यानुसार उपाय करा. अशातच नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून महिलांचं वजन वाढण्याचं एक कारण समोर आलंय.
महिलांना अधिक धोका
जर तुम्ही रात्री टीव्ही बघता बघता झोपलात आणि टीव्ही रात्रभर सुरूच राहिला किंवा तुम्ही लाइट सुरू ठेवून झोपत असाल तर हे तुमच्या फिटनेससाठी हानिकारक होऊ शकतं. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, रात्री कृत्रिम प्रकाशात झोपणाऱ्या महिलांना जाडेपणा होण्याचा धोका होऊ शकतो.
(Image Credit : Metro)
हा रिसर्च जेएएमए इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे. यात रात्री झोपताना कृत्रिम प्रकाश आणि महिलांचं वजन वाढणे यात संबंध असल्याचं समोर आलं आहे. या रिसर्चमधून असा निष्कर्ष निघाला की, झोपताना लाइट बंद केल्याने महिलांना जाडेपणा होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
काय विचारले महिलांना प्रश्न?
अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थाने सिस्टर स्टडीमध्ये ४३ हजार ७२२ महिलांच्या प्रश्नावलीचा डेटा वापर केला. ज्यात स्तन कॅन्सर आणि इतर आजारांसाठी धोकादायक असलेल्या गोष्टींचा अभ्यास केला गेला. या प्रश्नावलीमध्ये विचारण्यात आले की, तुम्ही झोपताना अंधारात झोपता का? कमी प्रकाशात झोपता का? किंवा बाहेरून रूममध्ये येणाऱ्या प्रकाशात किंवा टीव्हीच्या प्रकाशात झोपता का?
(Image Credit : Sunderland Echo)
या माहितीचा वापर करूनच वैज्ञानिक जाडेपणा आणि रात्री कृत्रिम प्रकाशात झोपणाऱ्या महिलांचं वजन वाढणं यातील संबंधावर अभ्यास करू शकले. यातून असं आढळलं की, रात्री मंद प्रकाशात झोपल्याने वजन वाढत नाही. पण ज्या महिला रात्री लाइटच्या प्रकाशात किंवा टीव्हीच्या प्रकाशात झोपतात, त्यांचं ५ किलो वजन वाढण्याची शक्यता १७ टक्के असते.
रात्री अंधार करून झोपणे शरीरासाठी चांगलं
या रिसर्चचे मुख्य लेखक डेल सॅंडलर सांगतात की, पारंपारिक रूपाने पाहिलं तर आपण रात्री अंधारातच झोपलं पाहिजे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, नाही तर आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दररोज प्रकाश आणि अंधारात आपलं शरीर असतं, तेव्हा त्यानुसारच शरीराची बॉडी क्लॉक २४ तासांसाठी काम करते. यादरम्यान शरीराचं मेटाबॉलिज्म, झोपेसाठी फायदेशीर हार्मोन्स, ब्लड प्रेशर आणि इतरही क्रिया योग्यप्रकारे काम करतात.