करमाळामधील देवाचीमाळ येथे 21 मार्चला एक भीषण अपघात झाला. यावेळी 14 वर्षाच्या करण पवार या मुलाला गंभीर दुखापत झाली. या मुलाचा हात हात मशीनच्या कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकला आणि शरीर ओढत गेलं त्यामळे याच्या छातीवरही जखमा झाल्या. अपघातानंतरची या मुलाची अवस्था पाहून सगळेचजण हादरले होते. हा मुलगा जगू शकेल याची कोणालाही खात्री नव्हती. या अपघातामुळे करणचे फुफ्फुसं आणि दोन्हींची अवस्था खराब झाली होती.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या करणचे फुप्फुस देखील बंद पडू लागले. हृदयाचे ठोके पडत असताना उघड्या डोळ्यांनी दिसत होते. छातीचा पिंजराही तुटला होता. या मुलाला श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं लगेचच मार्कंडेय सहकारी रुग्णालयात हलविण्यात आले. अशा गंभीर स्थितीत हृदय फुप्फुस तज्ज्ञ डॉ.विजय अंधारे यांनी पुढाकार घेत करणचे उपचार सुरू केले.
सावधान! हृदयाच्या आजारासाठी कारणीभूत ठरतात 'या' ५ सवयी; सर्वाधिक तरूण होताहेत शिकार
शस्त्रक्रियेसाठी टिम तयार करून रुग्णाला बेशुद्ध अवस्थेत हृदय शस्त्रक्रिया विभागामध्ये हलवण्यात आलं. बंद पडलेल्या फुप्फुसाला व्हेन्टिलेट करून फुगवण्यात आले. फुप्फुसातून बाहेर जाणारी हवा बंद करण्यात आली. हृदयाच्या नसा उघड्या पडून त्यातून रक्त वाहत होत. मोडलेल्या छातीच्या हाडांना जवळ आणून ती फिक्स करण्यात आली. तुमचा विश्वास बसणार नाही पण शस्त्रक्रियेच्या तासाभरानंतरच रुग्ण शुद्धीवर येऊन चक्क बोलायला सुद्धा लागला. आपल्या मुलाला बरा झालेला पाहून आई वडीलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
करणचे वडील म्हणाले की, "अपघातानंतर मुलाला जखमी अवस्थेत घेऊन अनेक रुग्णालयात गेलो. मात्र मुलाची स्थिती पाहता कोणतेही रुग्णालाय दाखल करुन घेण्यास तयार नव्हते. मग सोलापुरच्या मार्कंडेय रुग्णालयात मुलाला आणण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी पैसैही नव्हते. अशा स्थितीत पैशाची कोणतीही मागणी न करता डॉ. अंधारे यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे माझा मुलगा मला परत मिळाला.''
डॉक्टर विजय अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''शस्त्रक्रियेनंतर मुलगा शुद्धीवर येण्यास १ ते २ दिवस लागतील असे आम्हाला वाटले होते. मात्र अवघ्या तासाभरात हा मुलगा शुद्धीवर आला आणि दीड तासात मुलाला व्हेंटिलेटर वरुन काढल्यानंतर तो बोलू देखील लागला. इतक्या गंभीर परिस्थितीत आलेल्या मुलाला अवघ्या 6 दिवसात आम्ही डिस्चार्ज देखील करत आहोत. "