संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रत्येक व्यक्तीच्या पोटात दोन किडनी असतात. मात्र, काही जणांच्या पोटात ३ किडनी, तर काहींच्या पोटात ४ किडनीही आहेत. विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. प्रत्यारोपणात निकामी झालेली किडनी काढली जात नाही, तर त्या किडनीच्या बाजूला नवीन किडनी बसविली जाते. त्यामुळे पोटात किडनींची संख्या वाढते. जुनी किडनीदेखील काही प्रमाणात का होईना काम करत असते, असे तज्ज्ञ सांगतात.
किडनी पूर्णपणे निकामी झाल्यानंतर प्रत्यारोपण करण्यात येते. किडनी तात्पुरती निकामी झाली असल्यास डायलिसिस करून आयुष्य वाचविता येते. मात्र, किडनी तीन महिन्यांहून अधिक काळ निकामी झाली असेल तर प्रत्यारोपणाच्या पर्यायांची शक्यता तपासून पाहिली जाते.
अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे रुग्णाच्या किडनीमध्ये जंतुसंसर्ग असेल, खूप सूज असेल, खूप सारे मुतखडे असतील अथवा कर्करोगाची शक्यता असेल तरच जुनी किडनी काढली जाते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
असे होते किडनी प्रत्यारोपण
किडनी दाता आणि रुग्ण या दोघांवर शस्त्रक्रिया एकाच वेळेस बाजूबाजूच्या शस्त्रक्रियागृहांमध्ये होते.डाॅक्टरांची एक टीम दात्याची एक किडनी बाहेर काढते. डाॅक्टरांची दुसरी टीम रुग्णाच्या पोटामध्ये नवीन किडनी बसविण्यासाठी जागा तयार करते. डोनरची किडनी या नवीन जागेत पोटामध्ये बसवली जाते. तिला रक्त पुरवठा व मूत्र विसर्जनासाठीची मूत्राशयाशी जोडणी शस्त्रक्रियेद्वारे केली जाते.
आजवर ३५० पेक्षा अधिक रुग्णांच्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. फार कमी रुग्णांची जुनी किडनी काढावी लागली. प्रत्यारोपण केलेली किडनीही खराब झाली आणि पुन्हा प्रत्यारोपण झाले तर पोटात चार किडनी होतात. - डाॅ. सचिन सोनी, किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ
प्रत्यारोपणात निकामी किडनी काढात नाही तर बाजूला अथवा खाली नव्या किडनीचे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे पोटात ३ किडनी होतात. - डॉ. सुधीर कुलकर्णी, माजी अध्यक्ष, झेडटीसीसी
किडनी निरोगी राहण्यासाठी
- रोज १० ते १२ ग्लास पाणी पिणे.- नियमित व्यायाम- ४० वर्षांनंतर जेवणात मिठाचे प्रमाण कमी- डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे टाळणे.- उच्चरक्तदाब, मधुमेह, अतिस्थूलपणा नियंत्रणात ठेवणे.