डॉ. अविनाश सुपेमाजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय
क्तीच्या संपूर्ण शरीरात रक्त पसरावे (संचार व्हावा) याकरिता दबावाची आवश्यकता असते. हृदयाच्या स्पंदनामुळे हा दबाव होत असतो. हा दबाव नियमित राहिल्यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहिले जाते. त्यामुळे रक्त वाहण्यासाठी ज्या दाबाची गरज असते त्याला रक्तदाब असते म्हणतात. आकुंचन दाब १२० आणि प्रसरण दाब ८० मिमी म्हणजे डॉक्टर याला १२०/८० असे लिहितात. नुकतेच युरोप व अमेरिकेमधील शास्त्रीय संघटनांनी साधारण रक्तदाबासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल सांगितले. जगभरात त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा बदल होण्यापूर्वी रक्तदाब मार्गदर्शक तत्त्वे अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) आणि अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी (एसीसी) यांच्यानुसार खालीलप्रमाणे आहेत :
सामान्य : सिस्टोलिक १२० मिमी एचजी पेक्षा कमी आणि डायस्टोलिक ८० मिमी एचजी पेक्षा कमी
प्री हायपरटेन्शन : सिस्टोलिक १२०- १३९ मिमी आणि डायस्टोलिक ८० -८९ मिमी पेक्षा कमी
हायपरटेंशन स्टेज २ : सिस्टोलिक कमीतकमी १४० मिमी किंवा डायस्टोलिक कमीतकमी ९० मिमी
हायपरटेंसिव्ह क्रायसिस : सिस्टोलिक १८० मिमी पेक्षा जास्त आणि/किंवा डायस्टोलिक १२० मिमी पेक्षा जास्त, ज्यासाठी तातडीने वैद्यकीय मदत आवश्यक आहे.
मार्गदर्शक तत्त्वे कोण ठरवते?
ही मार्गदर्शक तत्त्वे सामान्यतः अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए), अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी (एसीसी) आणि जागतिक आरोग्य संघटनांसारख्या विविध देशांतील आरोग्य संघटनांच्या तज्ज्ञ समित्यांद्वारे ठरवली जातात. या समित्यांमध्ये हृदयरोग तज्ज्ञ, संशोधक, वैद्यक आणि इतर आरोग्य व्यावसायिकांचा समावेश असतो.
हल्लीच या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये उच्च रक्तदाबाच्या विविध श्रेणींचीही नवीन व्याख्या करण्यात आली आहे. यात प्री हायपरटेन्शनची श्रेणी काढून टाकली आहे.
त्याऐवजी, उच्च रक्तदाब (१२० ते १२९ सिस्टोलिक आणि ८० डायस्टोलिक पेक्षा कमी) आणि स्टेज १ हायपरटेन्शन (१३० ते १३९ सिस्टोलिक किंवा ८० ते ८९ डायस्टोलिक) असे वर्गीकरण केले आहे. त्यामुळे आता नवीन वर्गीकरण याप्रमाणे आहे.
सामान्य: सिस्टोलिक १२० मिमी पेक्षा कमी आणि डायस्टोलिक ८० मिमी पेक्षा कमी
उच्च रक्तदाब : सिस्टोलिक १२० -१२९ मिमी आणि डायस्टोलिक ८० मिमी पेक्षा कमी
हायपरटेंशन स्टेज १ : सिस्टोलिक १३० -१३९ मिमी किंवा डायस्टोलिक ८०-८९ मिमी
हायपरटेंशन स्टेज २ : सिस्टोलिक कमीतकमी १४० मिमी किंवा डायस्टोलिक कमीतकमी ९० मिमी
हायपरटेंसिव्ह क्रायसिस : सिस्टोलिक १८० मिमी पेक्षा जास्त आणि/किंवा डायस्टोलिक १२० मिमी पेक्षा जास्त, ज्यासाठी तातडीने वैद्यकीय मदत आवश्यक आहे.
जीवनशैली सुधारा
बऱ्याच वेळा डॉक्टरकडे गेले तर एखाद्या वेळी थोडासा रक्तदाब वाढला तर एकदम जन्मभर औषधे चालू करण्यापेक्षा जीवनशैली सुधारणे. मीठ कमी खाणे, जेवणामध्ये बदल करणे, योग व व्यायाम करणे इत्यादी करून रक्तदाब कमी होतो का, ते पाहावे. जर २-३ आठवड्यानेही रक्तदाब स्टेज २ च्या वर असेल तरच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. याचीच या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पुन्हा पुष्टी केली आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वे नमूद करतात की, रक्तदाब नियमितपणे मोजला जावा आणि लोकांना घरातील रक्तदाब यंत्र वापरण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. वयस्कर व्यक्तींनी आठवड्यातून एकदा तरी रक्तदाब मोजला पाहिजे आणि तुम्हाला काही लक्षणीय बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ज्येष्ठांनी आठवड्यातून रक्तदाब मोजावा
सर्वात मोठी समस्या अशी आहे की, ६५ आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना अचानक उच्च रक्तदाब असल्याचे निदान होते. कारण नवीन सामान्य पूर्वीपेक्षा २० पॉइंटने कमी आहे.
याचा अर्थ अशा प्रत्येक व्यक्तीस रक्तदाबासाठी औषधे घेण्याची गरज आहे का? तर असे नाही. डॉक्टर तुम्हाला तपासून, तुमच्या तपासण्या करून ठरतील की तुम्हाला औषधांची आवश्यकता आहे का? नवीन वर्गीकरणाप्रमाणे तुम्हाला औषधे देतील. मानसिक तणाव, राग, चिडचिड, कामाचा भार इत्यादी गोष्टींनी रक्तदाब वाढू शकतो.