सध्या उन्हाळा सुरू असून वातावरणामध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. या वातावरणात शरीराच्या आणि त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशातच आपण सर्व गोष्टींची काळजी घेतो पण डोळ्यांकडे मात्र दुर्लक्ष करतो. उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची खास काळजी घेणं आवश्यक असतं. कारण वातावरणातील वाढलेल्या उकाड्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढतात. या वातावरणात धूळ, प्रदूषण आणि सन स्ट्रोकमुळे डोळ्यांची जळजळ होणं, डोळ्यांवर ताण येणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्हालाही या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर डोळ्यांकडे दुर्लक्षं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं ठरतं. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यात डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासोबतच डोळ्यांच्या समस्यांपासूनही सुटका करून घेऊ शकता.
डोळ्यांच्या समस्या :
1. डोळ्यांची जळजळ होणं2. डोळ्यांना वेदना होणं3. डोळ्यांमधून सतत पाणी येणं4. डोळ्यांना खाज येणं
या गोष्टी लक्षात घ्या :
1. उन्हाळ्यामध्ये सन स्ट्रोक, धूळ, माती यांमुळे डोळ्यांमध्ये कण जाऊन डोळ्यांना खाज येते. अशावेळी आपण डोळे चोळू लागतो. असं करणं डोळ्यांसाठी घातक ठरतं. यावर उपाय म्हणून डोळे दिवसातून दोन-तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
2. चष्मा वापरत असाल तर त्याची फ्रेम मोठीच निवडा. ज्यामुळे डोळे पूर्णपणे कव्हर होतील. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचा सूर्याच्या अल्ट्रावॉयलेट किरणांपासून बचाव होऊ शकतो. या किरणांमुळे मोतिबिंदूसारख्या समस्या होऊ शकतात.
3. अभ्यास करताना किंवा वाचताना लख्ख प्रकाशात वाचा. याव्यतिरिक्त वर्षातून एकदातरी डोळे तपासून घ्या. डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने चष्म्याचा वापर करा. असं न केल्याने एंबलायोपियासारखा डोळ्यांचा आजार होण्याचा धोका वाढतो.
4. डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी उत्तम आहार घेणं आवश्यक ठरतं. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, सीझनल फळं, दूध आणि व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात असलेल्या पदार्थांचा आहारात सामावेश करणं फायदेशीर ठरतं. यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते.
5. कम्प्युटरवर सतत काम केल्याने कम्प्युटर विजन सिंड्रोम होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी एंटीग्लेयर चष्मा आणि एंटीग्लेयर स्क्रिनचा वापर करा. दर अर्ध्या तासान 10 ते 15 सेकंदांसाठी कम्प्युटर स्क्रिनवरून नजर हटवून थोडा वेळासाठी दुसरीकडे पाहा. याव्यतिरिक्त दर एक तासाने 5 ते 10 मिनिटांसाठी ब्रेक घ्या.
6. कम्प्युटरचा जास्त वापर, एसीमध्ये राहण्याची सवय, शरीराच्या छोट्या छोट्या समस्यांवर औषधांचं सेवन करण ड्राय आय सिंड्रोमसारख्या समस्या होण्याचा धोका वाढवतो. याकारणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, कोरडेपणा, खाज येणं यांसारख्या समस्या होतात. तुम्हालाही ड्राय आय सिंड्रोमचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या रूमचं टेम्परेचर कमी ठेवा. पाण्याचे सेवन जास्त करा. कोणताही आय ड्रॉपचा दिवसातून तीन ते चार वेळा वापर करा.
7. डोळ्यांमध्ये जोपर्यंत कोणतीही समस्या होत नाही. तोपर्यंत डोळ्यांसाठी कोणत्याही औषधाचा किंवा आय ड्रॉपचा वापर करू नका.
8. आय ड्रॉप ओपन केल्यानंतर एक महिन्यापर्यंतच त्याचा वापर करा. त्यानंतर वापर करणं शक्यतो टाळा.
9. डोळ्यांसाठी इतरांनी वापरलेला रूमाल आणि टॉवेल वापरू नका. त्यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.