आम्सटरडॅम : बारा वर्षांपूर्वी बाईक अपघातामुळे अपंग झालेले नेदरलँड्सचे गर्ट जॉन ओसकाम (४०) यांना ना चालता येत ना उभे राहता येत होते. मात्र वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनामुळे ते आता केवळ चालतच नाहीत तर पायऱ्याही चढू शकतात. वायरलेस डिजिटल ब्रिज तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. हे वायरलेस डिजिटल ब्रिज स्वित्झर्लंडमधील इकोले पॉलिटेक्निक फेडरेल डे लुसाने या संस्थेच्या न्यूरोसायंटिस्ट्सनी विकसित केले आहे. या तंत्राच्या मदतीने मेंदू आणि पाठीचा कणा यांच्यातील तुटलेले कनेक्शन पूर्ववत केले जाऊ शकते.
वायरलेस डिजिटल ब्रिज तंत्रज्ञान मेंदू आणि मणक्याच्या दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करते. काही वेळा पाठीच्या कण्याला किंवा मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे दोघांमधील संपर्क तुटतो. त्यामुळे लोकांच्या पायावर उभे राहण्याची आणि चालण्याची ताकद कमी होत आहे.
नेमके काय होते? तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या टीमचे ग्रेगरी कोर्टिने यांनी सांगितले की, मेंदू आणि मणक्याचा संपर्क पुन्हा जोडण्यासाठी आम्ही वायरलेस इंटरफेस तयार केला आहे. त्यासाठी ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. यातून आपल्या विचारांचे कृतीत रूपांतर होऊ शकते. तंत्रज्ञानाच्या मदतीने मेंदू पाठीच्या मणक्याच्या भागात संदेश पाठवतो ज्यामुळे आपल्याला हालचाल करता येते.
पाठीच्या कण्यात असतो लहान मेंदूकाही वर्षांपूर्वी, अमेरिकन संशोधकांनी मानवाच्या पाठीच्या कण्यातील लहान मेंदू शोधून काढला होता, तो चालताना संतुलन राखण्यास मदत करतो. चालताना, पायाच्या तळव्यावरील संवेदी अवयव या लहान मेंदूला दाब आणि गतीची माहिती पाठवतात. संशोधकांनी या मेंदूचे वर्णन मानवाचा ‘ब्लॅक बॉक्स’ असे केले होते.