(Image Credit : www.repertoiremag.com)
हायपरटेंशन म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या केवळ तरुण आणि वयोवृद्धांनाच नाही तर याच्या जाळ्यात आता शाळकरी मुलंही येऊ लागली आहेत. हरियाणा, गुजरात, गोवा आणि मणिपुरमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून हा खुलासा झाला आहे. त्यात सांगण्यात आलं की, प्रत्येक १० पैकी दोन शाळकरी मुलं-मुली हायपरटेंशनने पीडित आहेत.
अभ्यासातून हे समोर आलं की, काही मुलांमध्ये उच्च रक्तदाब फार कमी असतो आणि हे जीवनशैलीमध्ये बदल करुन म्हणजेच नियमित व्यायाम, योग्य आहाराने ठीक केलं जाऊ शकतं. जाड मुलांमधील ही समस्या चटपटीत खाद्यपदार्थ कमी करुन आणि वजन कमी करुन दूर केली जाऊ शकते. जर असं केलं गेलं नाही तर स्थिती आणखी वाईट होऊ शकते आणि नंतर डायबिटीज, हार्ट डिजीज आणि स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
या चार राज्यांमधील प्राथमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शाळांमधील १४, ९५७ विद्यार्थ्यांवर हा सर्व्हे करण्यात आला. २०१६ मध्ये AIIMS द्वारे जर्नल पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित एका दुसऱ्या सर्व्हेमध्ये देण्यात आलेल्या सूचनांनुसार, या सर्व्हेसाठी ५, १० आणि १५ वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली.
यूरोपियन जर्नल ऑफ प्रिवेंटिव कार्डियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या लेखिका डॉ. अनीत सक्सेना यांनी सांगितले की, २३ टक्के मुलांमध्ये हायपरटेंशनची समस्या होती. हा अभ्यास AIIMS, गोवा मेडिकल कॉलेज, मणिपुरच्या नेहरु आयुर्विज्ञान संस्थान, मुंबईतील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल आणि यूकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोने एकत्र मिळून केला.
हरियाणा(26.5 टक्के), गुजरात(१५ टक्के), गोवा(१० टक्के) आणि मणिपुर (२९ टक्के) विद्यार्थ्यांमध्ये जास्त रक्तदाब आढळून आला. हायपरटेंशनमधील ही विविधता वेगवेगळ्या ठिकाणांवरील वेगवेगळ्या खाद्य संस्कृती आणि वातावरण यामुळे बघायला मिळाली.
डॉ. अनीता सक्सेना यांनी सांगितले की, शाळेतील मुलांच्या उच्च रक्तदाबाची नियमीत तपासणी केली गेली पाहिजे. जेणेकरुन त्यावर उपाय केले जातील. यासाठी शाळांनी आरोग्य कार्यक्रमांमध्ये ब्लड प्रेशरच्या तपासणीचा समावेश करावा. ज्या मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असेल त्यांना वेळीच स्पेशलिस्टकडे घेऊन जावं. तसेच शाळेत निरोगी जीवनशैलीच्या सवयींबाबतही शिक्षण दिलं गेलं पाहिजे. जर या सूचना वेळीच पाळल्या गेल्या तर पुढे जाऊन डायबिटीज, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांना रोखण्यास मदत मिळू शकते.
उच्च रक्तदाब हेच हृदयविकारांचं कारण
उच्च रक्तदाब हेच भारतीयांना होणाऱ्या हृदयविकाराचे मुख्य कारण असून, या पाठोपाठ मधुमेह, तंबाखूचे सेवन व हाय कोलेस्टरॉल याही बाबी हृदयविकाराला कारणीभूत ठरत आहेत. ‘आऊटपेशन्ट केअर’वरील अभ्यासात ही बाब दिसून आली आहे.
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या पिनॅकल इंडिया कार्यक्रमात भारतीय नागरिकात वेगाने वाढणाऱ्या हृदयविकाराच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांच्या मते भारतात हृदयविकाराची शक्यता वाढत आहे; पण हृदयविकार असणाऱ्यांची काळजी किती व कशी घेतली जाते याची मात्र फारशी माहिती नाही. हे संशोधन जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रसिद्ध झाले.