एस्ट्राजेनेका आणि स्पुतनिक लाइटच्या एकत्र वापर करण्यासाठी एक क्लिनिकल अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, या कॉकटेल लसीचा कोरोनावर चांगला परिणाम होत आहे. यासह, अँटीबॉडीजची वाढ देखील चांगली होताना दिसत असल्याचे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)ने सांगितले.
हा डेटा २० लोकांकडून गोळा करण्यात आला आहे. या सर्वांचा अभ्यास फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला. त्यांना प्रथम एस्ट्राजेनेका देण्यात आली. त्यानंतर २९ दिवसांनी त्यांना स्पुतनिक लाइटचा डोस देण्यात आला.
अंतरिम विश्लेषणाच्या निकालांच्या आधारे, ५७ व्या दिवशी ८५ टक्के स्वयंसेवकांच्या शरीरात अधिक अँटीबॉडी असल्याचं निष्पन्न झालं. स्पुतनिक लाइट लसीतील मानवी एडेनोव्हायरस सेरोटाइप २६ एस्ट्राजेनेकाच्या लसीमध्ये मिसळले गेले. या लसींच्या कॉकटेलमध्ये, मानवी एडेनोव्हायरस २६ पहिला कंपोनंट म्हणून आणि मानवी एडेनोव्हायरस सेरोटाइप ५ दुसरा घटक म्हणून जोडला गेला.
आरडीआयएफने म्हटलं आहे की, एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली लस तसंच स्पुतनिक लस एकत्र करून तयार केलेली लस खूप प्रभावी आहे. Sputnik-V चे दोन्ही डोस घेतल्यानंतर, कोविड -19 च्या विरोधात ८०टक्के एफिकेसी दिसून आली आहे. त्याच वेळी, स्पुटनिक लाइटने कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटविरोधात चांगला परिणाम दाखवला आहे. या दोन लसींचे मिश्रण करून बनवलेल्या कॉकटेल लसीला कोरोनाविरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती मिळत असल्याचं समोर आलं आहे. तसंच, त्याची क्षमता दीर्घकाळ टिकेल असा दावा केला जातोय.