ठाणे – डोळ्यातील पाण्याचा दाब वाढल्यानं डोळ्याच्या मागच्या बाजूच्या नसेला इजा होते. हा अनुवाशिंक आजार असून योग्य वेळी उपचार न झाल्यास रुग्णाला अंधत्व येण्याचा धोकाही असतो. सुरुवातीला या आजाराची काही लक्षणं जाणवत नसल्याने आजार बळावल्यानंतर रुग्णाच्या डोळ्यावर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर ते नियंत्रणात आणण्यास समस्येला सामोरं जावं लागतं. ग्लुकोमामुळे रुग्णाला अंधत्व येण्याचं कारण आहे.
ठाण्यातील ३ जणांना या आजाराने ग्रासले होते. या तिघांवर श्रीरामकृष्ण नेत्रालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णांचा दृष्टीदोष कमी होण्यास मदत झाली. ओपन एंगल ग्लुकोमा हा जगात सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा काचबिंदूचा प्रकार आहे. डोळ्यांचा पुढील भागात ट्रेबेकुलर मेशवर्क ह्या जाळीतून पाण्याचा निचरा डोळ्याबाहेर होत असतो. अनुवांशिक कारणामुळे ह्या जाळीचे गुणधर्म बदलतात. ज्यामुळे डोळ्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. ह्यामुळे डोळ्यातील पाण्याचा दाब वाढून डोळ्याचा नसीला (Optic Nerve) इजा होते.
काचबिंदूची देशातील पहिली शस्त्रक्रिया ठाण्यात
आयस्टेंटच्या सर्जरीमुळे ठाण्यातील तिन्ही रुग्णांना नवी दृष्टी लाभली आहे. श्रीरामकृष्ण नेत्रालय आयस्टेंट व आयस्टेंट इनजेक्ट नावाच्या अमेरिकन कंपनीचे माइक्रो इन्सीजन ग्लुकोमा सर्जरी डिवाइस सर्वप्रथम भारतात आणले आहे. मानवी शरिरात रोपण होणारे हे डिवाइस जगातील सर्वाधिक सुक्ष्म असून त्याला यूएसएच्या एफडीएची मान्यता आहे. आयस्टेंट हा डोळ्यातून पाण्याचा निचरा करणाऱ्या ट्रैब्यूलर मेशवर्क मध्ये गुंतविले जाते त्यामुळे डोळ्यातील पाण्याचा अडकलेला मार्ग खुला होतो व त्यामुळे डोळ्यातील दाब नियंत्रित होतो. हे डिवाइस सुक्ष्म असल्याने ही शस्त्रक्रिया सुक्ष्म छेदातून होते.
मोतिबिंदू शस्त्रक्रिये बरोबर ह्या डिवाइसचे रोपण करणे शक्य असल्याने एकाच सुक्ष्म छेदाने दोन्ही शस्त्रक्रिया पार पडतात. डोळ्याचा दाब कमी झाल्याने डोळ्याच्या नशीची झीज नियंत्रणात आणता येते. डोळ्यावर कोणतेही अतिरिक्त छेद घेण्याची गरज भासत नाही. त्यामुळे जखम भरण्यास अगदी कमी अवधी लागतो अशी माहिती डॉ. नितीन देशपांडे यांनी दिली.