लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांसह ७४ औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. औषध किंमत नियंत्रक एनपीपीएने याबाबत निर्णय जाहीर केला आहे.
२१ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या १०९व्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या आधारे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ॲथॉरिटीने (एनपीपीए) औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. एनपीपीएने डेपाग्लिफ्लोजिन सिटाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिन हाइड्रोक्लोराइड (एक्स्टेंडेड-रिलीज टॅबलेट)च्या एका गोळीची किंमत २७.७५ रुपये निश्चित केली आहे.
त्याचप्रमाणे औषध किंमत नियामकाने रक्तदाब कमी करणाऱ्या टेल्मिसार्टन आणि बिसोप्रोलॉल फ्युमरेटच्या एका गोळीची किंमत १०.९२ रुपये निश्चित केली आहे. एनपीपीएने मिर्गी आणि न्यूट्रोपेनियाच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांसह ८० औषधांच्या कमाल मर्यादा किमतीतही बदल केला आहे.