स्त्रीची मासिक पाळी कायमची बंद होण्याच्या शारीरिक क्रियेला रजोनिवृत्ती असं म्हणतात. स्त्रीयांमध्ये वयाच्या 12 ते 14व्या वर्षी मासिक पाळीला सुरूवात होते, ज्याचा अर्थ स्त्री गर्भधारणेसाठी योग्य आहे, असा होतो. पाळी महिन्यातून एकदा येते व साधारण वयाच्या 45 ते 50 वर्षांपर्यंत चालू राहते. पण ही मासिक पाळी नेमकी कशी बंद होते? याबाबत अनेक महिलांना माहीतच नसतं. ज्यावेळी महिलांच्या ओव्हरी किंवा अंडाशयामध्ये प्रजननासाठी आवश्यक असणारे दोन हार्मोन्स एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन तयार होणं बंद होतं. आणि सतत पाळी येणं बंद होतं त्यावेळी ही रजोनिवृत्ती किंवा मोनोपॉजची सुरुवात समजली जाते.
जास्तीत जास्त महिलांमध्ये रजोनिवृत्ती वयाच्या 45 ते 50व्या वर्षी येते. पण अनेक महिलांमध्ये 30 ते 40 व्या वर्षीच मोनोपॉज होतं. ज्यामुळे या महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. मोनोपॉज हा कोणताही आजार नसून तो महिलांच्या शरीरामध्ये घडून येणारा एक नैसर्गिक बदल आहे. ज्यानंतर महिलांमध्ये अनेक हार्मोनल चेंजेस दिसून येतात. पण जर रजोनिवृत्ती किंवा मोनोपॉज जर वेळेआधीच होत असेल तर ही फार गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
भारतीय महिलांमध्ये सर्वात जास्त धोका
एका संशोधनातून असं समजलं की, जवळपास एक ते दोन टक्के भारतीय महिलांमध्ये 29 ते 34 वायादरम्यान रजोनिवृत्तीची लक्षणं दिसून येतात. याव्यतिरिक्त 35 ते 39 वयोगटातील महिलांमध्ये हा आकडा जवळपास आठपटींनी वाढतो.
मोनोपॉजदरम्यान उद्भवणाऱ्या समस्या
मोनोपॉजदरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वजन वाढणं, चिडचिड होणं, थकवा येणं, सतत खात राहणं किंवा भूक लागणं यांसारख्या समस्या महिलांमध्ये उद्भवतात. यातील काही समस्या शारीरिक असतात तर काही मानसिक. पण सर्व महिलांना एकाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. यापैंकी सतत भिती वाटणं ही सर्व महिलांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे. ही समस्या रात्री आणखी वाढते.
पोस्ट मेनोपॉजल ऑस्टियोपोरोसिस
मोनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये एक अशी समस्या उद्भवते ज्या पोस्ट मेनोपॉजल ऑस्टियोपोरोसिस असं म्हटलं जातं. मोनोपॉजनंतर स्त्रियांच्या शरीरामध्ये फिमेल हॉर्मोन एस्ट्रोजेनचा स्त्राव कमी होतो. हे हार्मोन त्यांच्या हाडांसाठी एखाद्या सुरक्षा कवचाचे काम करतं. याचे प्रमाण कमी झाल्यामुळे हाडांमधून कॅल्शिअम कमी होऊ लागतं. हे शरीराचं आपलं मेकॅनिज्म असून, ज्यावेळी रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होतं त्यावेळी कमतरता भरून काढण्यासाठी हाडांमधून कॅल्शिअम खएचून घेण्यात येतं. परिणामी हाडं कमकुवत होतात. कॅल्शिअमव्यतिरिक्त मेटाबॉलिज्मसाठीही हे हार्मोन करतं मदत.
प्रीमॅच्युअर मोनोपॉजची लक्षणं :
- अनियमित मासिक पाळी
- मासिक पाळीमध्ये अधिक रक्तस्त्राव होणं
- रक्तातील असंतुलन झाल्यामुळे शरीरात उष्णता होणं किंवा घाम येणं
- हृदयाचे ठोके वेगाने पडणं
- प्रायवेट पार्टमध्ये अनेक बदल घडणं
- त्वचा कोरडी पडणं
- स्वभाव चिडचिडा होणं
- अनिद्रेची समस्या उद्भवणं