नवी दिल्ली - पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचं प्रमाण वाढतं. हे आजार कोणालाही होऊ शकतात. पण लहान मुलांना हे आजार होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात डास चावल्याने होणारं आजार डोकं वर काढतात. त्यापैकी डेंग्यू हा गंभीर आजार आहे. यात रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात. वेळीच उपाय केले नाहीत, तर जीवावरही बेतू शकतं. सामान्यतः डेंग्यूची लक्षणं 2-3 दिवस टिकतात. लहान मुलं बाहेर खेळण्यासाठी जातात. त्यामुळे मुलांना डेंग्यूचा धोका जास्त असतो. डेंग्यूची काही लक्षणं जाणून घेऊया...
डेंग्यूची लक्षणं
- लहान मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणं ही मोठ्यांच्या तुलनेत सौम्य असतात. व्हायरल फ्लूप्रमाणे डेंग्यूची लक्षणं मुलांमध्ये दिसू शकतात.
- मुलांना ताप येतो. साधारणपणे आठवडाभर ताप राहू शकतो.
- मुलांमध्ये चिडचिड, सुस्ती, हिरड्या आणि नाकांतून रक्त येणं, अंगावर पुरळ येणं अशी लक्षणं दिसतात.
- कधीकधी दिवसातून 3-4 उलट्याही होतात.
- डेंग्यूमध्ये मुलांना थोड्या-थोड्या वेळानं खूप ताप येतो.
- मोठ्या मुलांना डोळे दुखणं, स्नायू दुखणं, सांधेदुखी व कधीकधी तीव्र डोकेदुखी होते.
डेंग्यूवर उपचार
- मुलांना ताप आल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा.
- डेंग्यू आणि चिकनगुनियाची लक्षणं सारखीच असतात. त्यामुळे डेंग्यूच्या तपासणीसाठी डॉक्टर ब्लड टेस्टचा सल्ला देऊ शकतात.
- डेंग्यूमध्ये ताप येत असल्यास डॉक्टर पॅरॅसिटॅमॉल देतील. तसंच सांधेदुखीसाठीही काही औषधं देतील.
- डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. रक्तस्रावही होऊ शकतो. त्यामुळे मुलांना कोणतंही अँटिइनफ्लमेटरी औषध किंवा इबुप्रोफेन देऊ नये.
डेंग्यूपासून मुलांचा असा करा बचाव
- पावसाळ्यात मुलांना डास चावू नयेत याची काळजी घेतली पाहिजे.
- पावसाळ्याच्या दिवसांत मुलांना शक्यतो बाहेर खेळायला पाठवू नका.
- बाहेर जाताना मुलांना फुल पँट, फुल शर्ट असे कपडे घाला.
- घराची व घराच्या बाजूची स्वच्छता ठेवा. डास मारण्याच्या उपायांचा वापर करा.
- संध्याकाळी डास घरात येण्याच्या वेळी दारं-खिडक्या बंद ठेवा.
- घरात पाण्याची साठवण शक्यतो करू नका. केल्यास ते उघडं ठेवू नका.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.