- मयूर पठाडेगुटगुटित, हसरं, खेळतं, निरोगी बाळ पाहिलं की आपल्यालाही कसं प्रसन्न वाटतं ना? पण असं बाळ जर आपल्याला हवं असेल तर ते संपूर्णत: आईवरच अवलंबून असतं. गर्भावस्थेत आईनं जर स्वत:ची नीट काळजी घेतली, आपल्या खाण्यापिण्याकडे आणि स्वास्थ्याकडे नीट लक्ष दिलं तर होणारं बाळही गुटगुटीत निपजतं, हे साऱ्यांनाच माहीत आहे, पण गर्भावस्थेच्या काळात आईच टेन्शनमध्ये असेल, वेगवेगळ्या काळज्यांनी तिला पोखरलेलं असेल तर जन्माला येणारं बाळही विकृती; विशेषत: मानसिक विकृती घेऊन जन्माला येऊ शकतं..शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आई होऊ इच्छिणाऱ्या आणि गर्भवती स्त्रियांना सावधानतेचा इशारा देताना त्यांनी सांगितलं आहे, गर्भावस्थेच्या काळात आनंदी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कुठलंही टेन्शन घेऊ नका. या काळातील आईच्या शरीरिक आरोग्याचा जसा जन्माला येणाऱ्या बाळावर परिणाम होतो, तसाच मानसिक आरोग्याचाही.
आईनं (आणि त्यासाठी अर्थातच बाबानंही) जर ही काळजी घेतली नाही, तर भविष्यात बाळाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. बाळाची वाढ खुंटू शकते. गर्भावस्थेत आईवर असलेला मानसिक ताण, टेन्शन जर थोड्या काळापुरतं असेल तर ठीक, पण सातत्यपूर्ण आणि जास्त कालावधीपर्यंत आई जर तणावात असेल त्यानुसार आईच्या शरीरातही बदल होतात. आईच्या टेन्शनचा बाळावर काय परिणाम होतो?
१- आईच्या गर्भात भू्रण आवरण द्रव असतो. हा द्रव म्हणजे पोटात वाढणाऱ्या बाळासाठी एक प्रकारचं कुशन असतं. हा द्रव म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील प्रमुख दुवा असतो. २- आईच्या शरीरातील पौष्टिक पदार्थ, पाणी, जैविक घटक यांचं आदानप्रदान करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम या द्रवाद्वारे होत असतं. आई टेन्शनमध्ये असेल तर या द्रवात असलेल्या स्ट्रेस हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, जे बाळाच्या आरोग्यासाठी घातक आहे.३- त्यामुळे जन्माला येण्यापूर्वीच बाळाच्या मेंदूच्या वाढीत अडथळे येऊ शकतात.४- आईच्या ताणामुळे जन्माला येणाऱ्या बाळाची भविष्यातील वाढही खुंटलेली असू शकते. ५- लक्ष एकाग्र करण्याची बाळाची क्षमता त्यामुळे अविकसित राहू शकते.६- बाळाला हृदयविकाराचा त्रास भविष्यात होऊ शकतो.७- जन्माला येणारं बाळ तडतडं, चिडचिडं आणि हायपरअॅक्टिव्ह असू शकतं.