मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्याला जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. मासिक पाळी येणं ही पूर्णतः नैसर्गिक क्रिया असते. मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा आल्यावर काही स्त्रियांना थोडाफार त्रास जाणवू शकतो. या दरम्यान स्त्रियांची शारीरिक स्थिती आणि मानसिक स्थितीमध्ये बदल घडून येतात. त्यामुळे स्त्रियांना या दिवसांत काही कामांपासून लांब राहणं गरजेचं असतं. त्यामुळे या दिवसांत होणारा त्रास आणि ताण दूर करण्यास मदत होते.
मासिक पाळी दरम्यान योगासनं, व्यायाम किंवा जॉगिंग यांसारख्या गोष्टी करणं टाळावे. त्यामुळे रक्तस्त्राव जास्त होतो. पोटदुखी वाढते. म्हणून या दिवसांत जास्त धावपळ, दगदग टाळावी.
या दिवसांत चिडचिड जास्त होते. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. शांत राहण्यासाठी तुम्हाला आवडत असलेल्या विषयांच्या पुस्तकांचे वाचन करा. तसेच तुम्ही गाणी ऐकू शकता किंवा तुमच्या आवडीचा एखादा चित्रपटही पाहू शकता.
काही महिलांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो. या दिवसांत रक्तस्त्राव होऊन थकवा येत असल्याने त्यांचे ब्लड प्रेशर वाढू शकते. त्यामुळे या दिवसांत स्वतःला शांत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, तसेच शारीरिक कष्टाची कामे करणं टाळा.
मासिक पाळीच्या दिवसांत त्वचा नाजूक होते. त्यामुळे त्वचेला जळजळ होईल अशा गोष्टींचा वापर करणे टाळावे. तसेच या दिवसांमध्ये थ्रेडींग किंवा फेशिअल करू नये. या दिवसांत त्वचेला अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते. बऱ्याच महिलांना अॅलर्जी होऊन त्वचा लाल होते.
मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखणेही गरजेचे असते. त्यामुळे या दिवसांत वापरण्यात येणारे सेनिटरी नॅपकिन दर पाच तासांनी बदलणे गरजेचे असते. तसेच या दिवसांत जास्तीत जास्त पाणी प्यावे. फळे, ड्रायफ्रुट्स, मासे यासारख्या गोष्टींचे सेवन करावे.