पुणे : सतत फास्टफूडचं सेवन, खाण्याच्या अनियमित वेळा, तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन ऍसिडिटीला आमंत्रण देत असते. ऍसिडिटी अर्थात आम्लपित्त कधीतरी होत असेल तर हरकत नाही मात्र रोजच त्रास होणार असेल तर मात्र तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची गरज आहे. मात्र अनेकदा बाहेर असताना ऍसिडिटीमुळे अस्वस्थ व्हायला सुरुवात होते आणि गोळ्या घेतल्या जातात. पण काही घरगुती उपाय केले तरी हा त्रास कमी होऊ शकतो.तेव्हा ऍसिडिटीचा समूळ नाश करण्यासाठी या उपाययोजना करा.
भरपूर पाणी प्या : कोमट किंवा थंड पाणी पिणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. साधारण दोन ग्लास पाणी घोटघोट प्यायल्याने छातीतली जळजळ कमी होते. या पाण्यात आवडत असल्यास बडीशेपची पावडर अर्धा चमचा टाका. त्यामुळे पाण्याला फ्लेवर तर येईलच पण जळजळही आटोक्यात येईल.
जीरे : छोटासा वाटत असला तरी हा उपाय गुणकारी आहे. चमचाभर जीरे चावून खाणे किंवा थंड पाण्यात जिरे पावडर घालून प्यायल्यास जळजळ कमी होते.
आवळा : सर्वांनाच माहिती असणारा हा उपाय आहे. ऍसिडिटी झाल्यास आवळा काळे मीठ लावून कच्चा खाता येईल. आवळा नसेल तर सरबत पिण्याचाही पर्याय आहे. इतकेच नव्हे तर जेवणानंतर आवळा सुपारी चघळल्यानेही ऍसिडिटी होत नाही.
तुळशीचे पान : जळजळ दूर होण्याचा हा उत्तम उपाय आहे. थोडीशी जरी जळजळ झाली तरी चार तुळशीची पाने धुवून खाल्ल्यास आराम पडतो.
गूळ : आम्लपित्तावर गूळ उपयोगी ठरतो. जेवण झाल्यावर १० मिनिटांनी गुळाचा लहानसा तुकडा खाऊन त्यावर थोडस पाणी प्यायल्यास ऍसिडिटीची समस्या उद्भवत नाही.
थंड दूध : ऍसिडिटी झाल्यावर कपभर थंड दूध पिताना त्यात कोणत्याही फ्लेवरची पावडर घालू नये. तसेच दुधात साखर घालणेही टाळावे. गायीचे दूध फ्रीजमध्ये थंड करून आणि आवडत असल्यास एक चमचा तूप घालून प्यावे.