सध्याचं धावपळीची जीवनशैली आणि कामाचा ताण यांमुळे अनेक लोकांना तणावाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकांमध्ये डिप्रेशनची समस्या उद्भवते. अनेकदा यापासून सुटका करण्यासाठी अनेक लोकं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेत असतात. पण यांसारख्या अनेक समस्यांवर तुम्ही घरच्या घरी स्वतःच उपचार करू शकता. यामुळे तुमचा ताण कमी होतोच पण त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वासही वाढतो. यासाठी तुम्हाला ध्यान करणं आवश्यक आहे. फक्त 10 मिनिटांमध्येच तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.
आपण अनेकदा दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या तणावांचा सामना करत असतो. अशातच अनेक नकारात्मक विचारांची डोक्यामध्ये गर्दी होते. पण अशा समस्यांना दूर करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून सल्ला घेणं आवश्यक नाही. असं आम्ही नाही सांगत आहोत, तर हे एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. कॅनडामधील वाटरलू यूनिवर्सिटीच्या संशोधकांच्या एका टिमने सांगितले की, दररोज फक्त 10 मिनिटांसाठी ध्यान केल्याने सतत येणाऱ्या नकारात्मक विचारांपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच तणावाबाबत जागरूकता पसरवल्यानेही यापासून सुटका करण्यासाठी मदत मिळते.
वाटरलू यूनिवर्सिटीचे संशोधक मेंग्रान शु यांनी सांगितले की, संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षांमधून असं सिद्ध झालं की, ध्यान केल्यामुळे तणावामध्ये असलेल्या लोकांच्या विचारांमध्ये परिणाम घडून येतो. नकारात्मक विचारांचे प्रमाण कमी होते. तसेच एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणं शक्य होतं.
तणावाने पीडित असणाऱ्या 82 लोकांवर हे संशोधन करण्यात आले. या संशोधनांतर्गत सहभागी व्यक्तींना कम्प्यूटरवर काम करण्यास सांगण्यात आले. ज्यामध्ये असं आढळून आलं की, आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याच्या त्यांच्या क्षमतेमध्ये काही अडथळे येत आहेत. त्यानंतर संशोधकांनी सर्व लोकांना दोन गटांमध्ये विभागले आणि एका गटाला गोष्ट ऐकण्यास सांगितले तर दुसऱ्या गटाला थोड्या वेळासाठी ध्यान लावण्यासाठी सांगितले. त्यावेळी ज्या गटाला ध्यान लावण्यास सांगितले होते त्यांच्यावर चांगला प्रभाव दिसून आला होता.
तणावामुळे काय होतं नुकसान?
तणावामुळे तुमची विचार करण्याची, समजून घेण्याची प्रक्रिया प्रभावित होते. याच्या सामान्य लक्षणांमध्ये सतत डोकेदुखी, वजन कमी-जास्त होणे, झोन न येणे, जेवण योग्य प्रमाणात न होणे, सतत आजारी पडणे, लक्ष केंद्रीत न करु शकणे, मूड स्विंग होणे आणि हायपरअॅक्टिव किंवा ओव्हर सेन्सीटीव्ह होणे. काही वेळी हे डिप्रेशनही असू शकतं.