रोज आपण कामाच्या ताणातून काहीसं फ्रेश (Fresh) वाटवं, शीण जावा यासाठी चहा (Tea) किंवा कॉफी (Coffee) घेतो. बहुतांश लोकांना सकाळी झोपेतून उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. सध्याच्या काळात रात्री उशिरापर्यंत काम किंवा अभ्यास करणारे तरुण-तरुणी झोप येऊ नये, यासाठी कॉफी घेतात. एकूणच चहा, कॉफी हे आपल्या दिनचर्येतले प्रमुख घटक असतात. काही वेळा चहा, कॉफी पिण्याची सवय व्यसनात (Addiction) रुपांतरित होते. चहा, कॉफी प्यायल्याने तुम्ही जागृत राहत असला आणि त्याचे आरोग्याला काही फायदे असले तरी त्याचे दुष्परिणामदेखील आहेत. त्यामुळे अतिप्रमाणात चहा, कॉफी पिण्याची सवय आरोग्यासाठी (Health) धोकादायक ठरू शकतं. चहा, कॉफीची सवय किंवा व्यसन दूर करण्यासाठी काही उपाययोजना करता येतात.
रोज प्रमाणात चहा, कॉफी पिणं आरोग्यसाठी हितावह असतं. मात्र अतिप्रमाणात चहा, कॉफी प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. प्रमाणापेक्षा जास्त कॅफिन (Caffeine) शरीरात गेल्यास शुगर लेव्हल (Sugar Level) नियंत्रणात राहण्यास अडथळे निर्माण होतात. कॅफिनमुळे एन्झायटी (Anxiety) अर्थात चिंता वाढते किंवा त्या सदृश्य लक्षणं निर्माण होतात. तसेच तुम्ही अतिक्रियाशील (Hyperactive) देखील होता. शरीर डिहायड्रेट होतं. त्यामुळे वेळीच चहा, कॉफी पिण्याची सवय सोडणं गरजेचं असतं. कॅफिनचं व्यसन सोडण्यासाठी काही उपाययोजना नक्कीच करता येतात.
कॅफिनचे व्यसन सोडण्याचा व्यायाम (Exercise) हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. जे लोक रोज व्यायाम करतात किंवा केवळ चालतात त्यांना दिवसभर चांगली ऊर्जा अनुभवास येते. कॅफिनच्या व्यसनाचा किंवा सवयीचा सामना करण्यासाठी झोपेचं चक्र अर्थात स्लीप सायकल व्यवस्थित करा. निरोगी जीवनाचा अवलंब करा. यात संतुलित जीवनशैली, व्यायाम, झोप, हेल्दी आहार आणि योग्य हायड्रेशनचा समावेश होतो. रोज कार्बोहायड्रेट, प्रोटिन, व्हिटॅमिन बी आणि सी मुबलक असलेल्या पदार्थांचं सेवन करा. यामुळे तुमची कॅफिन घेण्याची इच्छा नक्कीच कमी होईल. रोज कॅफिन नसेल तेव्हा तुम्हाला सुस्त वाटत असेल तर हळूहळू त्याचं सेवन कमी करा. रेग्युलर चहा, कॉफीऐवजी लेमन टी, ग्रीन टी, शहाळ्याचं पाणी यासारखी हर्बल ड्रिंक्स (Herbal Drinks) प्या. स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. धीर धरा. हार मानू नका. या गोष्टीसाठी वेळ नक्कीच लागतो, पण शेवट फायदेशीर असतो, हे लक्षात घ्या.
कॅफिनमुळे शरीरावर गंभीर दुष्परिणाम होतात. अतिप्रमाणात कॅफिन प्यायल्याने शांत झोप लागत नाही. कॅफिन हा साखरेनंतरचा सर्वात जास्त व्यसनाधीन करणारा पदार्थ आहे, त्यामुळे त्याला नकार न देणं ही सवय करा. कॅफिनमुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होते. अतिप्रमाणात कॅफिन प्यायल्यामुळे काही लोकांना जुलाब किंवा पातळ शौचाला होते. कॅफिनमुळे काहीवेळा खूप चिंता निर्माण होऊ शकते. त्यामुळे जास्त प्रमाणात चहा, कॉफी पिणं टाळणं गरजेचं आहे.