लवकर निजे, लवकर उठे त्याला उत्तम आरोग्य लाभे (Sleep Early, Wake Up Early) असं नेहमी म्हटलं जातं. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठल्यास आरोग्याबरोबरच बुद्धीही चांगली राहते असं म्हणतात. आपल्याकडे पिढ्यान्-पिढ्या सांगत आलेल्या गोष्टीवर आता विज्ञानानंही शिक्कामोर्तब केलं आहे. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये याचबद्दल एक महत्त्वाचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
जे टीनएजर्स (Teenagers) म्हणजे पौगंडावस्थेतील मुलं रोज सकाळी उशिरापर्यंत झोपतात, त्यांना भविष्यात मधुमेहासह (डायबेटिस) आरोग्याच्या अन्य समस्याही निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. अमेरिकेच्या ब्रिंघॅम यंग युनिव्हर्सिटीच्या (Brigham Young University) वतीनं हा अभ्यास करण्यात आला. या स्टडीच्या दरम्यान टीनएजर्सच्या खाण्याच्या पद्धतीवर संशोधकांनी अभ्यास केला. त्यासाठी एक आठवडा रात्रीची झोप साडेसहा तास आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात रात्रीची झोप साडेनऊ तास घ्यायला सांगून त्यांचं निरीक्षण केलं. दोन्ही वेळेस त्या स्वयंसेवकांना सारख्याच कॅलरीजचं सेवन देण्यात आलं. फळं आणि भाज्या कमी देण्यात आल्या आणि ज्यामुळे रक्तातील शुगर वाढेल असे अन्नपदार्थ जास्त खाण्यास सांगण्यात आले.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार जे थकलेले टीनएजर्स होते त्यांनी सरासरी 12 ग्रॅम साखर खाल्ली. म्हणजेच वर्षभरात त्यांच्या शरीरात अडीच ते तीन किलो साखर गेली. म्हणजेच रोजचे तीन चमचे साखर. 14 ते 17 वर्ष वयोगटातील टीनएजर्सवर करण्यात आलेलं हे संशोधन ‘Sleep’(स्लीप) जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.
आपण किती खात आहोत यापेक्षा आपण काय खात आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे, असं या स्टडीच्या प्रमुख डॉ. कारा ड्युरासियो (Kara Duraccio) यांचं म्हणणं आहे. आपण जेव्हा शुगर लेव्हल वाढवणारे पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ खातो किंवा जास्त साखर असलेले पदार्थ खातो तेव्हा ते उर्जा म्हणजेच एनर्जीच्या संतुलनावर नकारात्मक परिणाम करतात. त्याचबरोबर फॅटही वाढवतात. त्यामुळे वजन वेगाने वाढतं.
हल्ली टीनएजर्समध्ये वजन वाढण्याच्या समस्येचं हेही एक कारण आहे. दररोज चीज खाल्लं तक कार्डियोमेटाबॉलिक आजारांचा (cardiometabolic diseases) धोका वाढतो, असं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे. यामध्ये हार्ट ॲटेक, स्ट्रोक, उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आणि डायबेटिस सारख्या आजारांचा धोका वाढतो.
थकलेल्या टीनएजर्सना अगदी त्वरित एनर्जी हवी असते. त्यामुळे अनेकदा ते आरोग्यासाठी वाईट असणारे म्हणजेच अनहेल्दी पदार्थ खातात , असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आल्याचं डॉ. ड्युरासियो यांचं म्हणणं आहे. याच्याशी निगडीत एक अभ्यास ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनने (AASM) केला होता. जास्त झोपण्यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला होता. जे लोक रात्री 9 ते 11 तासांची झोप घेतात त्यांच्यामध्ये हृदयविकार होण्याचा धोका 38 टक्क्यांनी जास्त असतो, असं या अभ्यासात म्हटलं आहे.
लठ्ठपणा ही पौगंडावस्थेतील एक महत्त्वाची समस्या बनली आहे. त्यामुळे खाण्याबरोबरच झोपण्याच्या सवयीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र संशोधकांचं याकडे फार लक्ष गेलेलं नाही, असं डॉ. ड्युरासियो यांचं म्हणणं आहे. टीनएजर्सचं वजन वाढून न देण्य्साठी त्यांच्या शरीराला आवश्यक आहे तितकीच झोप घेणं हा उत्तम पर्याय आहे. त्याशिवाय सकाळच्या खाण्यामध्येही शुगर आणि कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांपेक्षा प्रोटिन जास्त असलेल्या पदार्थांचा जास्त समावेश असावा असंही त्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे तुमच्या किशोरवयीन मुलांच्या खाण्यापिण्याकडे आणि त्याचबरोबर त्यांच्या झोपण्याकडेही वेळीच लक्ष द्या. त्यांच्या आहारात प्रोटिनचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ असू द्या, म्हणजे वजन वाढण्यावर त्याचा परिणाम होणार नाही.