अनेकदा आपण दातांच्या समस्येकडे दुर्लक्ष करतो. पण जास्त काळ तो प्रॉब्लेम तसाच ठेवल्यास कर्करोगासारखी जीवघेणी समस्याही उद्भवू शकते. दातांमध्ये कीड लागण्याची समस्या सामान्यतः स्वच्छतेची काळजी न घेतल्याने होत असते. अनेकजण नीट ब्रश करत नाहीत, त्यामुळे दातांमध्ये घाण अडकत जाते आणि कीड लागते. कीडणे-सडणे यामुळे नैसर्गिक दात खराब होतो. द डेंटिस्टच्या मते, युनायटेड युरोपियन गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, ज्या व्यक्तींना हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो, तोंडात अल्सर आणि दात किडतात त्यांना हेपेटोसेल्युलर कार्सिनोमाचा धोका 75 टक्के वाढतो.
हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा हा यकृताच्या कर्करोगाचा सर्वात कॉमन प्रकार आहे. यूके कॅन्सर रिसर्चच्या आकडेवारीनुसार, यूकेमध्ये दरवर्षी यकृताच्या कर्करोगाची 6200 नवीन प्रकरणे आढळतात. आकडेवारीनुसार, यकृताचा कर्करोग हा कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे 8 वे सर्वात कॉमन कारण आहे. जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात 4,69,628 सहभागींच्या डेटाचे विश्लेषण केले. या लोकांमध्ये अशा लोकांचा समावेश होता ज्यांना तोंडात अल्सर, हिरड्या दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात तुटणे इत्यादी त्रास होतात. संशोधकांनी त्यांच्या तोंडांच्या आरोग्याचा अनेक वर्षे अभ्यास केला.
अभ्यासाअंती असे आढळून आले की, यापैकी 4069 जणांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सर झाला. या कर्करोगाच्या प्रकरणांपैकी, 531 (13 टक्के) सहभागींना काही-ना-काही प्रकारचे दातांचे विकार होते. क्वीन्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. हेडी जॉर्डो यांनी सांगितले की, पूर्वी अनेक प्रकारचे जुनाट आजार, हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेह यांचा तोंडाच्या आरोग्याच्या खराबतेशी संबंध होता. परंतु, पहिल्यांदाच असे आढळून आले आहे की, दातांच्या खराब आरोग्यामुळे यकृताचा कर्करोग देखील होऊ शकतो.
काय करायचं -नियमितपणे दात स्वच्छ करा. तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपताना ब्रश करणे आवश्यक आहे. जेव्हा दातांमध्ये घाण जास्त असते तेव्हा बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिसळून दात स्वच्छ करा. याशिवाय पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी मोहरीच्या तेलात मीठ टाकून दातांना चोळा. यामुळे दातांमध्ये अडकलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. घरगुती उपाय करूनही दात दुखत असल्यास किंवा हिरड्यांमधून रक्त येत असल्यास ताबडतोब दंत वैद्याकडे जावे.