सिगारेटच्या पाकिटावर ‘आरोग्यासाठी हानिकारक’ असा वैधानिक इशारा दिलेला असतो. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करत धूम्रवलये सोडणाऱ्यांची संख्या जगात कमी नाही. धूम्रपानाच्या या सवयीमुळे वर्षाकाठी अनेकांचे प्राण जातात. तंबाखूचेही तसेच. अशा या जीवघेण्या सवयींना आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) मैदानात उतरली आहे.
डब्ल्यूएचओचे ॲप
सर्व प्रकारच्या तंबाखू व्यसनापासून लोकांनी मुक्त व्हावे यासाठी डब्ल्यूएचओने ॲप विकसित केले आहे. ‘क्विट टोबॅको’ असे या ॲपचे नाव असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी दिली.या ॲपच्या वापरामुळे लोकांमध्ये तंबाखूच्या धोक्यांविषयी जागृती होईल, असा डब्ल्यूएचओला विश्वास आहे.
आग्नेय आशियातील चित्र
जागतिक आरोग्य संघटनेने २००० ते २०२५ या काळात आग्नेय आशियातील तंबाखू सेवनाच्या ट्रेण्डविषयीचा अहवाल तयार केला. गेल्या काही वर्षांत या भागात तंबाखूचा वापर कमी झाला असला तरी तंबाखू सेवनाच्या बाबतीत हाच भाग जगात अग्रेसर आहे. इलेक्ट्रॉनिक निकोटाइन डिलिव्हरी सिस्टीम, ई-सिगारेट, शीशा हे प्रकार धूरविरहित तंबाखू सेवनासाठी ओळखले जातात. भारत, श्रीलंका, इंडोनेशिया आणि बांग्लादेश हे देश तंबाखूची शेती करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी अभियान चालवत असल्याचे डब्ल्यूएचओच्या अहवालात म्हटले आहे.