Bacteria : घरात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बॅक्टेरिया असतात. त्यामुळे डॉक्टर नेहमीच स्वच्छतेचा सल्ला देत असतात. सामान्यपणे टॉयलेट सीट, बाथरूमच्या दारांचे हॅंडल, पाय पुसण्या, मोबाईल फोन यांच्या भरपूर बॅक्टेरिया राहत असल्याचं सांगितलं जातं. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, घरातील एक अशी गोष्ट आहे ज्यावर या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळतात. ती गोष्ट म्हणजे तुमच्या गादीवरील बेडशीट.
जास्तीत जास्त लोक गादीवर बसून त्यांची कामे करतात. मग ते पुस्तक वाचणं असो, मोबाईलवर सिनेमा बघणं असो किंवा पेपर वाचणं असो. बरेच लोक तर बेडवर बसूनच जेवण करतात. मात्र, बेडवरील चादरी, उशीचे कव्हर आपण कितीही झटकून वापरले तरी त्यात कोट्यावधी कीटाणू, फंगस असतात. जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत.
याबाबत एक रिसर्च काही दिवसांआधी समोर आला होता. या रिसर्चदरम्यान रिसर्चमध्ये सहभागी काही लोकांनी नवीन बेडशीट आणि उश्या वापरल्या. ४ आठवड्यांनंतर या बेडशीट आणि उश्यांना मायक्रोस्कोपखाली बघण्यात आलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला.
किती असतात बॅक्टेरिया?
या रिसर्चमधून आढळून की, एक महिना न धुता वापरल्या जाणाऱ्या बेडशीटमध्ये साधारण १ कोटींपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. तसेच ३ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ९० लाख बॅक्टेरिया, २ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ५० लाख आणि १ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ४५ लाख बॅक्टेरिया होते.
उशीवरील बॅक्टेरिया
सगळ्यात घाणेरडी आपली उशी असते. कारण आपला चेहरा आणि केस याच उशीवर असतात. यामुळे तेल, घाम आणि डेड स्कीन सगळ्यात जास्त उशीवरच लागते. रिसर्चनुसार, ४ आठवडे जुन्या उशीवर १.२ कोटी बॅक्टेरिया असतात. त्यासोबतच एक आठवडे जुन्या उशीच्या कव्हरवर ५० लाख बॅक्टेरिया असतात.
किती दिवसांनी बदलावी बेडशीट?
यावर डॉक्टरांचा सल्ला आहे की, दर आठवड्यात आपण आपली बेडशीट आणि उशीचं कव्हर बदललं पाहिजे. हे गरजेचं नाही की, बेडशीटवर डाग पडला असेल किंवा त्यातून वास येत असेल. अनेकदा चांगला वास येणाऱ्या बेडशीटमध्येही लाखो बॅक्टेरिया असतात. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी बेडशीट आणि उशीचे कव्हर वेळोवेळी बदला.