लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : अनेक खासगी रुग्णालयांतील औषधे दुकानातूनच औषध खरेदी करण्याची सक्ती केली जाते. मात्र, आता यापुढे अशी सक्ती चालणार नसून, इतर कोणत्याही औषध विक्रेत्यांकडून औषध खरेदी करता येणार आहे. औषध प्रशासनाच्या सूचनेनंतर खासगी रुग्णालयांमधील औषध दुकानांत असे फलकही झळकत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी या संदर्भात सहआयुक्त, सहायक आयुक्त, औषध निरीक्षक यांना एका पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. रुग्णालयांनी त्यांच्या संलग्न दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करणे ही बाब नियमबाह्य आहे. ‘त्यामुळे रुग्णालयातील औषध दुकानातून रुग्णांनी औषधांची खरेदी करावी, अशी सक्ती नाही. रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषधांची खरेदी करू शकतात,’ अशा आशयाचा फलक ठळकपणे रुग्णालयांनी लावण्याची सूचना केली आहे. त्यानंतर या आशयाचे फलक लावत आहेत.
... अन्यथा कारवाईआयुक्तांच्या सूचनेनुसार रुग्णालये, औषधविक्रेत्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार औषध दुकानांमध्ये फलक लावण्यात येत आहेत. लवकरच या संदर्भात बैठकही घेतली जाईल. त्यानंतरही रुग्णालयातील औषध दुकानांतूनच औषधी खरेदी करण्याची सक्ती केली जात असेल, तर कारवाई केली जाईल. - मिलिंद काळेश्वरकर, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन