- डॉ. मुफ्फजल लकडावाला,(प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन)लहानपणी गालगुच्चे घेण्यासारखे गोबरे गाल असणे ही कौतुकाची बाब असू शकते; पण एकदा वयात येण्याची शारीरिक प्रक्रिया सुरू झाली, की मात्र ती सगळ्या घरादाराच्या काळजीची बाब बनते. वाढते वजन ही जागतिक समस्या बनत चालली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे रोजचे जगणे अतिशय गतिमान झालेले आहे. त्याचा फटका शारीरिक स्वास्थ्याला बसत असून यातूनच लठ्ठपणाची समस्या गंभीर होते आहे. जागतिक आकडेवारीनुसार, सध्या लठ्ठपणामुळे होणारी मृत्यूसंख्या आणि आर्थिक हानी ही अनेक पटींनी जास्त आहे. भारतासारख्या मधुमेहींनी ग्रस्त असणाºया देशामध्ये याचे प्रमाण अतिशय वेगाने वाढताना दिसते.सर्वसाधारणपणे जी मुले वयाच्या ५ ते १० वर्षांमध्ये लठ्ठ होतात, ती पुढे टीनएजमध्ये लठ्ठ राहतात आणि पौगंडावस्थेमध्येही लठ्ठ राहतात. गुबगुबीत मान, गुबगुबीत गाल, सुटलेले पोट, सहजासहजी खाली वाकता न येणे, दिवसेंदिवस वाढत जाणारा पोटाचा घेर ही या आजाराची बाह्य लक्षणे आहेत. लठ्ठपणा येण्याचे प्रमाण हे मुले आणि मुलींमध्ये सारख्या प्रमाणात दिसून येते. यामध्ये आनुवंशिकतेचा काहीसा भाग सोडल्यास खाण्यापिण्याच्या सर्वसाधारण सवयी हा एक मोठा घटक कारणीभूत असतो. लठ्ठ मुलींमध्ये वयाच्या आधीच अगदी नवव्या-दहाव्या वर्षी पाळी सुरू होणे, नको त्या ठिकाणी अनावश्यक केसांची वाढ होणे, पाळी अनियमित येणे, योग्य बीजांडे निर्माण न होणे ही लक्षणे दिसतात. त्याप्रमाणे लठ्ठ मुलांमध्ये छातीची वाढ मुलीप्रमाणे होणे, योग्य पद्धतीने दाढी-मिशांची वाढ न होणे ही लक्षणे दिसून येतात. अर्थातच वजनाचा परिणाम होऊन वाढत्या वयामध्ये हाडांची अवेळी झीज, सांध्यांची अयोग्य किंवा अपुरी वाढ आणि विशेषकरून पायांच्या सांध्यांमध्ये होणारे बदल हे दीर्घकाळ परिणाम करणारे ठरतात. शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर अतिशय गुंतागुंतीच्या घडामोडी या वयात घडत असतात. लठ्ठ मुलांमध्ये कायम खंतावलेले आणि नकारात्मक व्यक्तिमत्त्व निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात. कुठलीही लक्षणे दिसू लागली, की ताबडतोब योग्य त्या डॉक्टरकडे जाऊन योग्य उपचार घेणे आवश्यक असते. या वयोगटातील मुलांची संप्रेरके, पोषणद्रव्ये आणि चयापचय या विविध पातळ्यांवर अभ्यास केला जातो. संपूर्ण कुटुंबाला उपचार पद्धतीमध्ये सामील करून घेण्यात येते.असाओळखा आजारगुबगुबीत मान, गुबगुबीत गाल, सुटलेले पोट, सहजासहजी खाली वाकता न येणे, दिवसेंदिवस वाढत जाणारा पोटाचा घेर ही तर या आजाराची बाह्य लक्षणे आहेत. इतर लक्षणे पुढीलप्रमाणे ओळखावीतहे करा- पिष्टमय पदार्थ, तेल-तूप, साखर, मीठ यांचे प्रमाण कमी करावे.- मैद्याच्या पदार्थांचे सेवन टाळून गव्हाचे पदार्थ खावेत.- आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा, कमी अन्न प्रक्रिया केलेले पदार्थ शरीरास अधिक चांगले, त्याचे सेवन करावे.- आहारात प्रथिनांचा पुरेसा पुरवठा असावा. यामुळे चरबीवर नियंत्रण राहते.- दर महिन्याला वजन पाहून आहारनियंत्रित करावा.
गुबगुबीतपणाचे अजिबात कौतुक नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 2:31 AM