लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु, काही लोकांची समस्या लठ्ठपणा नाही तर त्यांचं वाढलेलं पोट असतं. वाढलेल्या पोटामुळे तुमचा लूक तर खराब दिसतोच पण इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाहीतर इतरही अनेक गंभीर आजार बळावण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोटोच्या आजूबाजूला काही प्रमाणात चरबी असणं अत्यंत आवश्यक असतं. कारण कंबरेच्या हाडांच्या रक्षणासाठी ती आवश्यक असते. पण पोटाच्या आजूबाला असलेली चरबी म्हणजेच, फॅट्स जर एका ठराविक मर्यादेपेक्षा वाढली तर अनेक गंभीर आजारही बळावू शकतात. जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत, ज्यांमुळे पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढवण्यासाठी जबाबदार ठरतात.
अनुवंशिकता
काही लोकांच्या पोटावर चरबी जमा होण्याचं कारण हे अनुवंशिक असतं. जर त्यांच्या कुटुंबामध्ये आई-वडिलांपैकी कोणा एकाला जरी लठ्ठपणाची समस्या असेल तर त्यामुळे त्यांच्या मुलांनाही ही समस्या होण्याची शक्यता वाढते.
पचनक्रिया कमकुवत होणं
जर एकाद्या व्यक्तीला पचनक्रियेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्या व्यक्तीच्या पोटावर चरबी जमा होऊ लागते. पचनक्रिया कमकुवत असल्यामुळे त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पचनक्रिया कमकुवत असल्याने शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उदा. थायरॉइड, डायबिटीस इत्यादी.
हार्मोन्समध्ये बदल
चाळीशी ओलांडल्यानंतर अनेक महिलांना वाढत्या वयाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, मोनोपॉज. ज्यामुळे महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजनचं प्रमाण कमी होऊ लागतं. तसेच एंड्रोजनचं प्रमाण वाढू लागतं. ज्यामुळे कंबर आणि पोटाच्या आजूबाजूला चरबी जमा होऊ लागते.
गरजेपेक्षा जास्त जेवण करणं
अनेक लोक काहीही काम नसल्यामुळे किंवा तणावामध्ये असल्यामुळे गरजेपेक्षा जास्त खातात. अनेकदा तर या व्यक्ती भूक नसतानाही उगाचच भरपेट खात राहतात. ज्यामुळे त्यांच्या पोटावरील चरबी वाढू लागते.
दिवसभर फक्त बसून राहणं
फक्त बसून राहिल्यानेही अनेक लोकांच्या पोटाजवळील चरबी वाढू लागते. बसल्या बसल्या फक्त मोबाईल, टिव्ही पाहत राहणं यामुळे शारीरिक अॅक्टिव्हिटी फार कमी होते. पोटावर वाढणाऱ्या चरबीमागील हेही एक मुख्य कारण आहे.
तणावात राहणं
जर एखादी व्यक्ती तणावात असेल तर पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढते, परिणामी लठ्ठपणाही वाढतो. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, कार्टिसोल. जेव्हा व्यक्ती तणावात असते त्यावेळी शरीरारील कार्टिसोलचं प्रमाण वाढतं. कार्टिसोल शरीरामधील फॅटचं प्रमाण वाढविण्यासाठी मदत करतो. त्यामुळे कंबर आणि पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढू लागते. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.