मासिक पाळी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. बऱ्याचदा मासिक पाळीच्या या चक्रामध्ये अनियमितता येते. त्याची कारणे प्रत्येक स्त्रीच्या वयानुसार वेगवेगळी असू शकतात. सामान्यतः मासिकपाळी दर 25 ते 28 दिवसांनी येते. या चक्रामध्ये अनेक कारणांमुळे अनियमितता येऊ शकते. अनेकदा मुलगी वयात आल्यानंतर म्हणजेच पाळी सुरू झाल्यानंतर, तरूणपणात, तसेच स्त्रीयांच्या रजोनिवृत्तीच्या वेळी म्हणजेच पाळी बंद होण्याच्यावेळी ही अनियमितता आढळून येते. या तिन्ही वयोगटांमध्ये होणाऱ्या पाळीच्या अनियमिततेची कारणे वेगवेगळी आहेत. याकारणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्त्रीयांना अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे या तीन वयोगटांमध्ये पाळी अनियमित होण्यची कारणे काय आहेत यांची माहिती घेऊयात...
मासिक पाळी सुरू होते तेव्हा...
ज्यावेळी मुलगी वयात येते म्हणजेच तिची पाळी सुरू होते त्यावेळी अनेकदा पाळीच्या चक्रामध्ये अनियमितता आढळून येते. वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी ज्यावेळी पहिल्यांदा पाळी येते त्यानंतर पुढिल 2 ते 3 महिने किंवा सहा महिने पाळी आलीच नाही असेदेखील होते. यामागे स्त्रीबीज तयार होण्याचे चक्र सुरळीत नसणे हे यामागील कारण आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पाळीमध्ये अनियमितता असल्यास घाबरून जाण्याचे काहीच कारण नसते. सुरुवातीच्या काळात पाळीचे चक्र सुरळीत होण्यासाठी वेळ लागू शकतो. तसेच बऱ्याचदा पाळी आल्यानंतर अधिक 20 ते 25 दिवस रक्तस्त्राव होतो. अशावेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज (पीसीओडी)
ह्ल्लीच्या तरूणींमध्ये पाळीच्या अनियमितपणाचे मुख्य कारण म्हणजे पीसीओडी. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढते वजन यांमुळे पीसीओडीचा त्रास वाढतो. यामध्ये ओव्हरिजवर लहान लहान गाठी तयार होतात. पीसीओडीचा त्रास स्त्रीबीजनिर्मितीच्या प्रक्रियांमुळे होऊ शकतो. पीसीओडीच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले तर पुढे वंध्यत्वाची समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. तसेच मधुमेह, वजन वाढणे, चेहऱ्यावर मुरमं येणे, केस गळणे यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे पीसीओडीच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
वाढलेल्या वजनामुळे पाळीमध्ये अनियमितता
वाढलेले वजन आणि स्थूलपणामुळे पाळीमध्ये अनियमितता येते. यासाठी योग्य आहार आणि व्यायामाच्या सहाय्याने वजन कमी करणे गरजेचे असते.
थायरॉइड
शरिरातील थायरॉइडच्या ग्रंथींमधून स्रवणाऱ्या हॉर्मोन्सच्या कमतरतेमुळे अनियमित पाळीचा त्रास उद्भवतो. यामध्ये सतत थकवा येतो, अचानक वजन वाढते तसेच पाळीमध्ये रक्तस्राव कमी होतो. अशावेळी डॉक्टर स्त्रीयांना हॉर्मोन्सच्या चाचण्या करायला सांगतात.
चाळीशीनंतर होणारी अनियमित पाळी
पाळी जाताना म्हणजे रजोनिवृत्तीच्या काळात पाळीचे चक्र अनियमित होते. हार्मोन्समध्येही असंतुलन होते. अशावेळी पाळीमध्ये अनियमितता आल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसते. परंतु या दिवसांत पाळी लवकर येऊ लागली किंवा रक्तस्राव अधिक होऊ लागला तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.