बाळाच्या जन्मापासून पुढच्या काही महिन्यांपर्यंत प्रत्येक आई बाळाला सुदृढ बनवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असते. त्याला न्हाऊ-माखू घालणं, त्याची काळजी घेणं त्याचप्रमाणे त्याच्या शारीरिक वाढीसाठी त्याला मालिश करणं यांसारख्या गोष्टी ती अगदी कसोशिनं करत असते. अनेक डॉक्टरांनी बाळाला देण्यात येणाऱ्या मालिशबाबत सांगितले की, बाळाला देण्यात येणाऱ्या मालिशमुळे फक्त बाळाची शारीरिक वाढच होत नाही तर मानसिक वाढ होण्यासही मदत होते.
बाळाला मालिश करण्यासाठी कोणतं तेल वापरांव, याबाबत अनेक पालकांच्या मनात प्रश्न असतात. मग सरळ बाजारात मिळणाऱ्या विविध ब्रँडच्या तेलांचा वापर करण्यात येतो. पण काही घरगुती तेलांनी बाळाला मालिश करणं फायदेशीर ठरतं. अनेक वर्षांपासून बाळाला मालिश करण्यासाठी राईच्या तेलाचा वापर करण्यात येतो. पण याव्यतिरिक्त डॉक्टरांनी बाळाच्या मालिशसाठी उपयुक्त असे काही तेलाचे प्रकार सांगितले आहेत. जाणून घेऊयात त्याबाबत...
1. बदामाचे तेल
बदामामध्ये अनेक पोषक तत्व असतात, त्याचप्रमाणे बदामामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे याने बाळाला मालिश केल्याने बाळाच्या त्वचेवर तजेला येतो, तसेच त्वचा मुलायम होते. बदामाच्या तेलचा बाळाच्या शरीरातील हाडांनाही फायदा होतो.
2. ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिज पदार्थ आढळून येतात. या तेलाने बाळाची मालिश केल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत करतो. जर बाळाच्या केसांची वाढ कमी असेल तर या तेलाने मालिश केल्याने फायदा होईल.
3. खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याचं तेलही बाळाच्या मालिशसाठी चांगलं समजलं जातं आणि हे सहज उपलब्ध होतं. याने मसाज केल्याने बाळाचं त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. खोबऱ्याचं तेल थोडं कोमट करून वापरलं तर बाळाच्या त्वचेला आणि केसांना फायदा होतो.
4. मोहरीचं तेल
बाळाच्या मालिशसाठी मोहरीच्या तेलाचा वापर करण्याचा सल्ला अनेक वडिलधारी माणसं अनेकदा देत असतात. त्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे, या तेलामुळे त्वचेला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. त्याचप्रमाणे हाडं मजबूत होण्यासही मदत होते.
5. तूप
दूध आणि दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ, बाळांसाठी फायदेशीर मानले जातात. तुपाने बाळाची मालिश केल्याने शरीराला ऊब मिळते. हिवाळ्यामध्ये बाळाला तुपाने मालिश करणं फायदेशीर समजलं जातं.