(Image Creadit : FamilyDoctor.org)
शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी सर्व पोषक तत्वांप्रमाणेच कॅल्शिअम देखील आवश्यक असतं. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळ्या प्रमाणात कॅल्शिअमची गरज असते. कॅल्शिअम शरीराचं कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. आपले दात आणि हाडांमध्ये 99% कॅल्शिअम असतं. जेव्हा शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता होते. त्यावेळी हाडे कमकुवत आणि नाजुक होतात. अशावेळी हाडांना फ्रॅक्चर होण्याची भिती वाढते. याव्यतिरिक्त शरीराला अनेक आजार होण्याचा धोका वाढतो.
मानवाच्या वाढत्या वयानुसार भासणारी कॅल्शिअमची मात्रा वेगवेगळी असते. वयोवृद्ध व्यक्तीमध्ये प्रतिदिन 1000-1300 मिलीग्रॅम, तरूणांमध्ये प्रतिदिन 1300 मिलीग्रॅम, लहान मुलांमध्ये 700-1000 मिलीग्रॅम आणि एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये प्रतिदिन 250 ते 300 मिलीग्रॅम कॅल्शिअमची आवश्यकता असते. शरीरामधील कॅल्शिअमची पातळी कमी झाली तर मात्र शरीराच्या अनेक समस्या उद्भवतात. शरीरातील कॅल्शिअम कमी झाल्यानंतर शरीरात काही लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया अशा काही लक्षणांबाबत...
1. हाडं कमजोर होणं
शरीरामधील कॅल्शिअम कमी झाल्यामुळे हाडं ठिसूळ होऊ लागतात. याव्यतिरिक्त अंगदूखीचा त्रासही होऊ लागतो. जर तुम्हालाही दररोज हात आणि पायांमध्ये वेदना जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2. मासिक पाळीमध्ये वेदना होणं
अनेक महिलांना मासिक पाळीमध्ये वेदनांना सामोरं जावं लागतं. परंतु ज्या महिलांमध्ये कॅल्शिअमची कमतरता असते त्यांना मासिक पाळीमध्ये जास्त त्रास होतो. त्याचसोबत मासिक पाळीमध्ये अनियमितता आणि पाळी उशीरा येण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
3. दातांच्या समस्या
शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता असेल तर त्याचा परिणाम सर्वात आधी दातांवर दिसून येतो. दातांना किड लागणं, दातांमध्ये वेदना होणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. मुलांमध्ये लहानपणापासूनच कॅल्शिअमची कमतरता असेल तर त्यांना दात उशीरा येतात.
4. नखं कमकुवत होणं
जर तुमची नखं वारंवार तुटत असतील तर तुमच्या शरीरात कॅल्शिअम कमी आहे. नखं वाढण्यासाठी कॅल्शिअमची गरज असते. जेव्हा शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण योग्य नसेल तर नखं कमकुवत होऊन तुटण्यास सुरुवात होते.
5. थकवा येणं
थोडं चाललं किंवा थोडसं जरी काम केलं तर लगेच थकवा येत असेल तर समजुन जा की, तुमच्या शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता आहे. त्याचप्रमाणे शरीरात कमी कॅल्शिअम असल्यामुळे अनिद्रा, सतत भिती वाटणे आणि तणावात राहणे यांसारखी लक्षणंदेखील दिसून येतात.
6. हृदयाची धडधड वाढणं
हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठीही कॅल्शिअम गरजेचं असतं. याची कमतरता असल्यामुळे हृदयाची धडधड वाढते. ज्यामुळे सतत बैचेन झाल्यासारखं वाटतं.
7. केस गळणे
केसांची वाढ होण्यासाठी कॅल्शिअमची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे शरीरातील कॅल्शिअम कमी झाले तर केस गळतात, कोरडे होतात. जर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागते असेल तर डॉक्टरांच्या सल्याने तपासणी करून घ्या. आणि आहारात कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा समावेश करा.