लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात एकही स्वाइन फ्लुच्या नव्या रुग्णांची नोंद झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता. असे असताना, मंगळवारी पुन्हा ठाणे पालिका हद्दीत ९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ५४१ इतकी झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लु या आजाराने आतापर्यंत १५ जणांचा बळी गेला आहे. मागील काही दिवसांपासून स्वाइन फ्लुचा वाढता प्रादुर्भाव हा आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, मंगळवारी जिल्ह्यात सहा महापलिका, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रापैकी ठाणे महापलिका क्षेत्रात ९ नव्या स्वाइन फ्लुच्या रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात स्वाइन फ्लुने बाधित रुग्णांची संख्या ५४१ वर गेली आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या ५४१ रुग्णांपैकी ४५२ रुग्णांवर यशस्वी उपचार करून ठणठणीत होवून घरी परतले आहे. तर, अवघ्या ७४ रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.