न्यू यॉर्क- विकसनशील देश असो वा विकसित देश मधुमेह सर्वच देशांतील लोकांमध्ये झपाट्याने पसरत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. अमेरिकेमध्ये प्रत्येक ७ लोकांपैकी एका व्यक्तीस मधुमेह असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. तसेच यापैकी अनेकांना आपल्याला मधुमेह आहे याची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब तज्ज्ञांनी उघड केली आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार अमेरिकेतील १४ टक्के प्रौढांना मधुमेह असण्याची शक्यता आहे. १० टक्के प्रौढांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहितीच नाही तर ४ टक्के लोकांच्या मधुमेहाचे निदान झालेले नाही. मधुमेह अमेरिकेतील एक स्थायी आजार झाला असून ३ कोटी लोकांना मधुमेह झाला आहे अशी माहिती या वित्रागाचे साथजन्य आजारतज्ज्ञ मार्क एबेरहार्ट यांनी दिली. वय वाढलेल्या लोकांना मधुमेह होण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे प्रौढ, वृद्धत्त्व हे मधुमेही लोकांची संख्या जास्त होण्याचे एक कारण आहे असे ते सांगतात. तसेच लठ्ठपणामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे मार्क सांगतात. ज्या लोकांना आपल्याला मधुमेह नाही असे वाटते त्यांनीही मधुमेहासाठी रक्ततपासणी केली पाहिजे, कारण मधुमेह नाही असे वाटणाऱ्या प्रत्येक तीन व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असल्याचे तपासणीतून सिद्ध झाले आहे असे मार्क एबेरहार्ट सांगतात.
अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत ९५ टक्के मधुमेहींना टाइप टू डायबेटिस झाला आहे. हा मधुमेह साधारणपणे (नेहमी नव्हे) लठ्ठपणा आणि वजनवृद्धीशी संबंधित असतो. तर ५ टक्के रुग्णांना टाइप वन डायबेटिस आहे. हा मधुमेह अगदी कमी वयात होतो आणि तो जीवनशैलीशी संबंधित नसतो. तसेच या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात अमेरिकेतील १६ टक्के पुरुषांना तसेच १२ टक्के महिलांना मधुमेह आहे. वंशांनुसार मधुमेहाचा विचार केल्यास हिस्पॅनिक वंशाच्या २० टक्के लोकांना, कृष्णवंशियांमध्ये १८ टक्के तर श्वेतवर्णियांमध्ये १२ टक्के लोकांना मधुमेह आहे. सामान्य पातळीपेक्षा वजन जास्त असणे आणि लठ्ठपणा हे मधुमेहाचे मुख्य कारण बनत चालल्याचेही या संशोधकांना लक्षात आले. सामान्य पातळीइतके किंवा त्यापेक्षा कमी वजन असणाऱ्या लोकांपैकी केवळ ६ टक्के लोकांना मधुमेह होता. वजन अधिक असणाऱ्या लोकांमध्ये ते प्रमाण १२ टक्के इतके होते. तर लठ्ठ (ओबेस) लोकांमध्ये ते प्रमाण २१ टक्के इतके होते. मधुमेह झाल्यानंतर त्यावर उपचार उपलब्ध असले तरी लोकांनी मधुमेह होऊच नये यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे एबरहार्ट यांचे मत आहे. आजार रोखणे हीच कधीकधी योग्य उपचारपद्धती असते असे ते म्हणतात.