कोविड-19 ची (Covid Cases) तिसरी लाट (Covid third Wave) येऊन गेल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं कोरोना निर्बंध उठवले आहेत. दोन वर्षांहून अधिक काळापासून निर्बंधांमध्ये वावरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येनं उसळी घेतली आहे. त्यात जागतिक पटलावरच्या युद्धजन्य परिस्थितीनं आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. एकंदरीतच या सर्व परिस्थितीचे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. ते कमी करण्यासाठी काय करावं तसंच काय करू नये या विषयी माहिती देणारं वृत्त 'दैनिक जागरण'नं प्रसिद्ध केलं आहे.
आपलं मन आणि डोकं शांत ठेवण्यासाठी योगसाधना आणि ध्यानधारणा करणं खूपच फायदेशीर आहे. योग आणि ध्यानानं अस्वस्थता, नैराश्य, राग आणि काळजी कमी होते. किंबहूना योगसाधनेमुळे ध्यानधारणेची शक्ती बळकट करण्यासाठी तसंच इम्युनिटी वाढवण्यासही मदत मिळू शकते. आपल्या मनात घोळणाऱ्या असंख्य विचारांवर योगसाधनेमुळे नियंत्रण मिळवता येतं. अनिश्चित काळासाठी आपलं डोकंही शांत राहण्यास मदत मिळते. तुम्ही अस्वस्थता, काळजी, नैराश्य या समस्यांचा सामना करत असाल तर डोकं शांत ठेवण्यासाठी काय उपाय करायला हवेत हे पाहूया.
- आपल्या अंथरुणावर शांतपणे डोळे बंद करून १० मिनिटं बसा, दीर्घ श्वास घ्या आणि ध्यानधारणा करा. शांततेसाठी ही सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. यामुळे तुमची झोप खराब करणाऱ्या वाईट विचारांपासून मुक्ती मिळेल. तुम्हाला वाईट स्वप्नंही पडणार नाहीत.
- सकाळी लवकर किंवा सायंकाळी फिरायला जा. किमान अर्धा तास चाला. यामुळे तुम्हाला शरीरातून खूप चांगलं फीलिंग निर्माण होईल.
- सकाळी उठल्याउठल्या मोबाईल पाहू नका. त्याऐवजी बाल्कनी किंवा खुल्या हवेत बाहेर पडा. दिलासा देणारं संगीत ऐका, ध्यानाचा अभ्यास करा आणि दीर्घ श्वास घ्या.
- मोबाईल फोनचा वापर करणं सोडा आणि आयुष्य, ज्ञान आणि आंतरिक शक्तीशी संबंधित पुस्तकं, लेख किंवा एखादा रिसर्च वाचण्यास सुरुवात करा.
- घरातील खिडक्या-तावदानं बंद करून ठेवू नका. सकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास काही काळ घरात व्हेंटिलेशन होऊ द्या.
- चांगले सिनेमे पाहा, विशेषतः लाइट टॉपिक किंवा कॉमेडी सिनेमे पाहा. यामुळे तुमचं अस्वस्थ मन शांत होईल. चांगलं आणि हलकं अन्न खा, जेणेकरून तुमचं पोट निरोगी राहील आणि तुम्ही फिट राहाल.
- म्युझिक थेरपी खूपच परिणामकारक ठरू शकते. म्युझिक थेरपी तुम्हाला आश्चर्यचकित, आनंदी करणाऱ्या झोनमध्ये घेऊन जाते. तिथं तुम्हाला खूपच आनंद वाटतो. म्हणूनच ही खूप परिणामकारक ठरू शकते.
- हे उपाय करून पहा नक्की तुमच्या मनावरचं दडपण कमी होईल आणि तुम्ही आनंदी व्हाल.