कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांना घरी बसण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. सतत घरी राहिल्यामुळे शरीराची फारशी हालचाल होत नाही त्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही समस्या उद्भवत आहे. तुमच्या काही चुकांमुळे काहीही फॅट फुड न खाता सुद्धा तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला या सवयींबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही आपल्या सवयी बदलून आरोग्य चांगले ठेवू शकता.
जास्तवेळ झोपणं
लॉकडाऊनमुळे अनेकांना खूपच आळस यायला लागला आहे. रात्री उशीरापर्यंत जागून सकाळी उशीरा उठण्याचे प्रमाण सुद्धा वाढलं आहे. ९ तासांपेक्षा जास्त झोपेला ओव्हर स्लिप समजलं जातं. तसंच ७ तासांपेक्षा कमी झोपल्यामुळे आजारांचा धोका असतो. जास्त झोपल्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते. म्हणून शक्यतो झोपेच्या वेळा नियमीत ठेवा. वेळेत झोपायला आणि उठायला सुरूवात करा.
नाष्ता न करणं
अनेकजण लॉकडाऊनमध्ये असा विचार करतात की, घरीच असल्यामुळे नाष्ता कधीही करू शकतो. किंवा केला नाही तरी चालेल. पण नाष्ता न केल्यामुळे मेटाबोलिज्म प्रभावित होते. वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर न चुकता नाष्ता करा. नाष्ता करताना फायबर्सयुक्त पदार्थाचा समावेश करा.
(घामोळ्यांनी हैराण असाल तर; 'या' घरगुती उपायांनी खाज, पुळ्यांसह जळजळ होईल दूर)
कमी पाणी पिणं
पाणी कमी प्यायल्यामुळे शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. वाढत्या तापमानात गरमीचा त्रास वाढून शरीर डिहाड्रेट होण्याची शक्यता असते. पाणी कमी प्यायल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होत नाही. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. दिवसभरातून ८ ते १० ग्लास पाणी प्या. त्यामुळे शरीरातील टॉक्सीन्स बाहेर निघण्यास मदत होते.
व्यायाम, स्ट्रेचिंग न करणं
लॉकडाऊनमुळे अनेकांना जीमला जाता येत नाही. फक्त चालून तुमचं वजन कमी होणार नसतं. त्यासाठी शरीराची स्ट्रेचिंग आणि व्यायाम करणं महत्वाचं आहे. स्वतःसाठी १० ते २० मिनिटं वेळ देऊन तुम्ही शरीराची स्ट्रेचिंग करून व्यायाम करा. त्यामुळे शरीर लवचीक राहील. शरीराचा आकार बेढब होऊ नये असं वाटत असेल तर रोज जमेल तसे सोपे व्यायाम प्रकार करून शरीर चांगलं ठेवा. कारण लठ्ठपणा आल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. म्हणून लॉकडाऊनमध्ये वजन वाढणार नाही याची काळजी घ्या.
(CoronaVirus News : 'हे' नवीन औषध कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ठरेल प्रभावी, तज्ज्ञांचा दावा )