बंगळुरू: २०३० सालापर्यंत भारतामध्ये हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. या कालावधीपर्यंत झालेल्या दर चार मृत्यूंपैकी एक मृत्यू हृदयविकारामुळे होईल, असा इशारा प्रख्यात हृदरोगतज्ज्ञ डॉ.सी.एन. मंजुनाथ यांनी दिला. युवक, किशोरवयीनांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
एचएएल मेडिकॉन-२०२२ या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, देशात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरोग्याकडे नीट लक्ष देणे, उत्तम जीवनशैलीचा अंगीकार करणे, तसेच खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण राखणे, व्यसनांपासून दूर राहणे आदी उपाय योजले, तर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. डॉ. सी.एन. मंजुनाथ हे श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्च या संस्थेचे संचालक आहेत.
डॉ.सी.एन. मंजुनाथ म्हणाले की, युवक, तसेच किशोरवयीन मुलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) आयोजिलेल्या एचएएल मेडिकॉन-२०२२ या कार्यक्रमाचे उद्घाटन एचएएलचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी केले.
पक्षाघातही मोठा शत्रू
जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक-पंचमांश मृत्यू हे हृदयविकार व पक्षाघातामुळे होतात. सध्या भारतात दरवर्षी ३० लाख लोक हृदयविकार व पक्षाघाताने मरण पावतात. त्यातील ४० टक्के लोक हे ५५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. गेल्या २६ वर्षांत भारतात हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ३४ टक्क्यांनी वाढले आहे.
निम्मे रुग्ण पन्नाशीतले
भारतात हृदयविकाराचा झटका आलेल्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे, तर २५ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात.
ही काळजी घ्या
- व्यसनांपासून दूर राहा- उत्तम जीवनशैलीचा अंगीकार करा- खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा (वृत्तसंस्था)