सफरचंद खाण्याचे वेगवेगळे फायदे आपण नेहमीच ऐकत असतो. पण सफरचंदामुळे एका मुलाचं आयुष्य उद्धस्त झालं आहे. नीहाना रेनाटा असं या मुलाचं नाव आहे. न्यूझीलॅंडच्या Rotorua चा राहणारा हा चिमुकला २२ महिन्यांचा असताना त्याने सफरचंदाचा एक तुकडा खाल्ला आणि आयुष्यभरासाठी व्हिलचेअरमध्ये बसला. रेनाटा हा त्याची जुळी बहीण ओटीयासोबत डे केअरमध्ये होता. तिथे स्टाफने त्याला एक सफरचंदाचा एक छोटा तुकडा दिला. डॉक्टरांनी सांगितले की, नीहाना पॅरालाइज्ड झाला आहे आणि त्याला ब्रेन डॅमेजही झाला आहे.
३० मिनिटाच्या आत कार्डियक अरेस्ट
'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, डे-केअर स्टाफने नीहानाला कच्चा सफरचंदाचा तुकडा खायला दिला. पण हा तुकडा त्याच्या घशात अडकला. नीहानाला श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे ३० मिनिटातच त्याला कार्डियाक अरेस्ट आला आणि त्याचं शरीर हलणं बंद झालं. नीहानाचे वडील वाय रेनाटा यांना फोन लावण्यात आला सांगितलं गेलं की, तुमचा मुलगा श्वास घेऊ शकत नाहीये.
हॉस्पिटलमध्ये दोन महिने
या धक्कादायक घटनेनंतर नीहानाला २ महिने रूग्णालयात रहावं लागलं. तो ना चालू शकत होता ना कोणताही हालचाल करू शकत होता. मुलाची अशी स्थिती झाल्यामुळे त्याची आई मारामाला नोकरी सोडावी लागली आणि आता ती २४ तास मुलासोबत असते. मारामा स्वत: एक डॉक्टर आहे. मात्र असं असलं तरी ती डे-केअरमधील स्टाफला यासाठी जबाबदार मानत नाही. पण तिचं म्हणणं आहे की, लहान मुलांसाठी कच्चा सफरचंद हानिकारक आहे. त्यामुळे ते त्याला खायला का दिलं गेलं?
रिपोर्टमधून खुलासा
न्यूझीलॅंडच्या आरोग्य मंत्रालयाने कच्चा सफरचंद पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी धोकादायक खाद्य पदार्थाच्या यादीत ठेवलं आहे. नीहानासोबत ही घटना २०१६ मध्ये घडली होती. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण डॉक्टरांनी आता स्पष्ट केलं आहे की, नीहानाच्या स्थितीत विशेष सुधारणा नाहीये आणि त्याला आता हे जगणं आयुष्यभरासाठी सहन करावं लागणार आहे. रविवारी 'चाइल्ड फोरम' नावाच्या एक लॅबचा रिपोर्ट समोर आला. यात सांगण्यात आलं आहे की, प्राथमिक चिकित्सेतही हलगरजीपणा करण्यात आला होता.
त्यासोबतच इवॉल्व एज्युकेशन ग्रुपच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, लहान मुलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या फूड पॉलिसीमध्ये बदल करण्याची गरज आहे. तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुला-मुलींना सफरचंद किंवा असंच एखादं कठोर फळ उकडल्याशिवाय दिलं जाऊ नये.