आपण जे खातो त्यात जर मीठ नसेल तर त्या पदार्थांना काहीच चव लागत नाही. तसेच जर काही पदार्थांमध्ये जास्त मीठ झालं तर ते खाताही येत नाहीत. बरं जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्याचही मोठं नुकसान होऊ शकतं. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मिठाच्या अधिक सेवनामुळे आतड्यांना सूज येऊ शकते. अशात मिठाचं कमीत कमी सेवन केल्यास तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
मिठाच्या अधिक सेवनामुळे आतड्यांना सूज येऊ शकते, असं अमेरिकेतील अभ्यासकांनी साधारण २० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एका क्लिनिकल ट्रायल डेटाचं विश्लेषण करताना सांगितलं. रिसर्चमध्ये सोडियमचं अधिक सेवन केल्याने आतड्यांवर सूज आढळली. त्यासोबतच जास्त फायबर असलेला आहार घेणाऱ्या लोकांमध्ये कमी फायबर असलेला आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत आतड्यांवर अधिक सूज आढळली.
(Image Credit : Bel Marra Health)
आतड्यांमध्ये सूज येण्याचं कारण
रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, अमेरिकेतील साधारण एक तृतियांश लोकसंख्या आतड्यांवर सूज येण्याच्या समस्येचा सामना करत आहे. पोटात तयार होणारा गॅस हे याचं कारण सांगण्यात आलं आहे. त्यांनी सांगितले की, गॅस फायबरला पचवणाऱ्या बॅक्टेरियामुळे तयार होतो. अभ्यासकांनी सांगितले की, फायबर असलेल्या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण वाढल्याने गॅसची समस्या वाढते. त्यामुळे अधिक फायबर असलेल्या आहारात मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे.
(Image Credit : Live Science)
अल्सरची सुद्धा होते समस्या
या रिसर्चनुसार, जास्त मीठ खाल्ल्याने अल्सरची समस्या सुद्धा होऊ शकते. कारण शरीरात मिठाच्या अधिक प्रमाणामुळे हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणजेच एच पायलोरी बॅक्टेरिया सक्रिय होतात. याने पोटात अल्सरची समस्या होऊ शकते. रिसर्चमधून समोर आलं आहे की, जास्त मिठामुळे शरीरातील एच पायरोली बॅक्टेरिया घातक रूप घेतात आणि पचनक्रिया कमजोर करतात. यानेच अल्सरची समस्या होऊ शकते.
त्यासोबतच वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, मिठाच्या अधिक सेवनामुळे आतड्यांचा कॅन्सर, किडनीसंबंधी समस्या, शरीरात सूज आणि किडनी स्टोन होण्याचाही धोका अनेक पटीने असतो.