Oral Health Tips : सगळ्याच लोकांच्या दिवसाची सुरूवात ही टूथब्रश सोबत होते. दातांचं आणि तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज ब्रश करणं किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही ब्रश करताना लोक काही चुका करतात. जर तुमचा टूथब्रश चांगलं नसेल तर तुम्हाला आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे ब्रश नेहमी स्वच्छ असावा. इतकंच नाही तर तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता हेही तेवढंच महत्वाचं आहे. जास्तीत जास्त घरांमध्ये घरातील सगळे सदस्य त्यांचे टूथब्रश एकाच बॉक्समध्ये एकत्र ठेवतात. पण असं करणंही महागात पडू शकतं. याने इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशात आज आम्ही तुम्हाला टूथब्रशबाबत काय काळजी घ्यावी हे सांगणार आहोत.
ब्रश भिजवू नका
जास्तीत जास्त लोक हे आधी टूथब्रश पाण्यात भिजवतात आणि मग त्यावर टूथपेस्ट लावतात. असं केल्याने ब्रश दाते नरम होतात. ब्रशची दात चांगल्याप्रकारे स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ही चूक न करण्याचा डॉक्टरही सल्ला देतात. दात स्वच्छ करण्याआधी टूथब्रश भिजवू नका आणि जर तसे करणे गरजेचेच असेल तर १ सेंकदापेक्षा जास्त तो पाण्याखाली धरु नका.
टॉयलेटमध्ये ठेवू नका
अनेक घरांमध्ये टॉयलेट आणि टूथब्रश ठेवण्याची जागा फारच जवळ असते. टॉयलेटमध्ये फ्लश केल्यावर अनेक किटाणू उडतात आणि ते सहजपणे आजूबाजूच्या भिंतींवर वस्तूंवर सहज जाऊन बसतात. त्यात ब्रशही असतो. त्यामुळे ब्रश कधीही टॉयलेटच्या आजूबाजूला ठेवू नये.
बंद करुन ठेवू नका
आजकाल बाजारात ब्रशसोबत त्याचे दाते झाकून ठेवण्यासाठी वेगवेगळे बॉक्सेस मिळतात. पण ब्रश अशाप्रकारे बंद करुन ठेवणे योग्य नाहीये. याने ब्रशमधील किटाणू वाढतात. सोबतच टूथब्रशचा वापर करुन झाल्यावर तो सरळ उभा ठेवा. याने ब्रशमधील पाणी खाली जाईल आणि ब्रश लगेच कोरडा होईल. याने ब्रशमध्ये किटाणू वाढण्यासाठी लागणारा ओलावाही राहणार नाही.
वेगवेगळे ठेवा सर्वांचे ब्रश
जास्तीत जास्त घरांमध्ये ही चूक केली जाते. परिवारातील सगळ्याच सदस्यांचे ब्रश एकाच ठिकाणी एकत्र ठेवले जातात. डॉक्टरांनुसार, असे केल्याने एका टूथब्रशमधील बॅक्टेरिया दुसऱ्या टूथब्रशमध्ये सहजपणे शिरतात. त्यामुळे सर्व ब्रश एकत्र ठेवू नका. तसेच एकाला असलेला आजार दुसऱ्याला होण्याचाही धोका वाढतो.
या गोष्टींची घ्या काळजी
ब्रश हवेमध्ये सुकायला ठेवा, याने फंगस होणार नाही. ब्रश स्वच्छ करण्यासाठी ब्रश उकळत्या पाण्यात ५ मिनिटांसाठी ठेवा. टूथब्रशचं डोकं एका ग्लासमध्ये ठेवून त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि पाणी टाकून थोडावेळ भिजवा. दात फार ताकद लावून घासू नका. याने हिरड्यांना इजा होऊ शकते. ब्रश केल्यानंतर बोटांनी हिरड्यांची हळूहळू मसाज करा. याने हिरड्या मजबूत होतील.